बोलिवियाहून मेडेलिन आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या विमानाला अपघात झाला आहे. या चार्टर विमानातून ब्राझीलमधील स्थानिक फुटबॉल संघ प्रवास करत होता. ७२ प्रवाशांना घेऊन प्रवास करत असलेले हे विमान कोलंबियात कोसळले आहे.

या विमानाने बोलिवियाहून उड्डाण केल्याची माहिती विमानतळ व्यवस्थापनाने ट्विटरवर दिली होती. या चार्टर विमानातून चॅपकोयन्स हा ब्राझीलमधील स्थानिक फुटबॉल संघ प्रवास करत होता. कोपा सुदामिरेका स्पर्धेची अंतिम फेरी खेळण्यासाठी चॅपकोयन्सचा संघ मेडेलिनला जात होता. बुधवारी होणाऱ्या अंतिम फेरीत चॅपकोयन्सची गाठ ऍटलेटिको नॅशनल संघाशी पडणार होती. ‘या अपघातातून काहीजण बचावतील,’ अशी आशा मेडेलिनचे महापौर फेडेरिको गुटियेरेझ यांनी व्यक्त केली आहे.

‘हा अपघात अतिशय दुर्देवी आहे,’ असे फेडेरिको गुटियेरेझ यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. शहराबाहेर असणाऱ्या पर्वतीय भागात मध्यरात्रीच्या सुमारास हे विमान कोसळल्याची माहिती समोर येते आहे. या अपघाताची माहिती मिळताच बचाव दल आणि रुग्णवाहिका दुर्घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.