पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या अधिवेशनादरम्यान अनुपस्थित राहणाऱ्या भाजपच्या खासदारांना चांगलेच फैलावर घेतले आहे. संसदेच्या अधिवेशनादरम्यान अनुपस्थितीत राहणाऱ्या खासदारांना पंतप्रधान मोदी यांनी संसदीय दलाच्या बैठकीत चांगलेच सुनावले. पंतप्रधानांनी भाजपच्या खासदारांना संसदेमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या. संसदीय कामकाजादरम्यान सतर्क आणि सजग राहण्याचा सल्लादेखील मोदींनी खासदारांना दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा पक्षाच्या नेत्यांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना फैलावर घेतात. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबतच प्रशासकीय सेवेत उच्चपदावर कार्यरत असणाऱ्यांची झाडाझडती घ्यायलादेखील पंतप्रधान मोदी मागेपुढे पाहात नाहीत. पंतप्रधान मोदींकडून मंत्री आणि अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सूचनांचीही अनेकदा चर्चा होते. पंतप्रधान मोदी सरकारच्या कारभाराविषयी अतिशय सजग असल्याचे चित्र आतापर्यंत वारंवार पाहायला मिळाले आहे. आज (मंगळवारी) संसदीय दलाच्या बैठकीत याचाच प्रत्यय आला आहे.

खासदारांनी संसदेच्या कारभारादरम्यान अतिशय सजग राहायला हवे, असे पंतप्रधान मोदी यांनी खासदारांना सांगितले. ‘अनेकदा खासदार जेवणानंतर अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होत नाहीत. बहुसंख्य खासदार दुपारनंतर संसदेत दिसत नाहीत. खासदारांच्या अनुपस्थितीमुळे अनेकदा महत्त्वाची विधेयके मंजूर होण्यास विलंब होतो. त्यामुळे कामकाजाला दांडी मारण्याची सवय खासदारांनी बदलायला हवी. त्यामुळे महत्त्वाची विधेयके वेळेवर मंजूर होतील,’ अशा सूचना पंतप्रधान मोदींनी स्वपक्षीय खासदारांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘अनेकदा सभागृहात गणसंख्येसाठी आवश्यक असलेल्या संख्येइतकेही खासदार उपस्थित नसतात. संसदेत विधेयके मंजूर करुन घेणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळेच सरकारमध्ये असलेल्या पक्षाच्या खासदारांची संसदेतील उपस्थिती आवश्यक आहे. सरकारमध्ये असलेल्या पक्षाच्या खासदारांचे ते कर्तव्य आहे. त्यामुळे संसदेतील अनुपस्थिती सहन केली जाणार नाही,’ अशी तंबीच पंतप्रधान मोदींनी भाजपच्या खासदारांना दिली.