एरवी आपल्या वक्तृत्वाने सभा जिंकणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी लोकसभेत आम आदमी पक्षाच्या (आप) खासदाराविषयी दाखविलेले सौजन्य सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आल्याप्रकरणी ‘आप’चे खासदार भगवंत मान बुधवारी लोकसभेत केंद्र सरकारविरोधात घोषणा देत होते. सभागृहातील मोकळ्या जागेत सतत घोषणाबाजी करून दमलेले भगवंत मान यावेळी थोडी उसंत घेत आजूबाजूच्या बाकांवर पाण्याचा ग्लास दिसतो का हे पाहत होते. नेमक्या त्याचवेळी सभागृहात उपस्थित असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:चा पाण्याचा ग्लास भगवंत मान यांच्यासमोर धरला. भगवंत मान यांनी मोदी यांनी दिलेले पाणी प्यायलेही, त्यानंतर पाण्याचा ग्लास मोदींच्या टेबलावर परत ठेवताना दोन्ही नेत्यांमध्ये हास्याची देवाणघेवाणही झाली. भगवंत मान यांनी ग्लास टेबलावर ठेवल्यानंतर मोदींनी त्यावर झाकण ठेवले. विशेष म्हणजे भगवंत मान यांनीदेखील पाणी प्यायल्यानंतरही मोदी सरकार हाय-हाय अशा घोषणा देणे सुरूच ठेवले. दरम्यान, हा प्रकार पाहून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, सुषमा स्वराज यांच्यासह सर्वच खासदारांना हसू आवरले नाही. सभागृहातील भाजप सदस्यांनी बाक वाजवून मोदींच्या या कृतीचे कौतुक केले.