“करोना महासाथीच्या आजच्या परिस्थितीत तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. महासाथीमुळे अनेक गोष्टींमध्ये बदल होत आहेत. करोनानं दजगाला एक महत्त्वपूर्ण गोष्ट शिकवली आहे. जागतिकीकरण हे महत्त्वाचं आहेच. पण त्यासोबत आत्मनिर्भर होणंही तितकंच गरजेचं आहे, हे या काळात दिसून आलं आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आयआयटी दिल्लीच्या दिक्षांत सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला.

“आज भारत तरूणांना व्यवसाय करण्यात सुलभता आणून देण्यास कटिबद्ध आहे. कारण ते आपल्या नव्या व्यवसायाद्वारे कोट्यवधी लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवू शकतात. देश व्यवसाय करण्यास सुलभता निर्माण करून देईल तुम्ही नागरिकांचं जीवनमान उंचावण्याचं काम करा,” असंही मोदी यावेळी म्हणाले. पहिल्यांदाच कृषी क्षेत्रात काही नवं करण्याची आणि स्टार्टअपच्या संधी निर्माण झाल्या आहेत. पहिल्यांदाच अंतराळ क्षेत्रात खासगी संस्थांच्या गुंतवणुकीचे मार्ग उघडले आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यासारख्या सुविधांपासून रोखणाऱ्या तरतुदीही हटवण्यात आल्या आहेत. यामुळे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र जागतिक बनेल आणि तरूणांसाठी अधिक संधीही उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

“तुम्हा सर्व विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता आहे. तुम्ही सर्वात कठिण परीक्षांपैकी एक समजली जाणारी जेईईची परीक्षा उत्तीर्ण होऊन आयआयटीमध्ये आला आहात. परंतु दोन गोष्टी आहेत ज्या तुमची क्षमता अधिक वाढवतील. पहिली म्हणजे लवचिकता आणि दुसरी म्हणजे नम्रपणा. तुमच्याकडे जे आहे ते फार कमी लोकांनी केलं आहे,” असंही मोदी यावेळी म्हणाले.