मिर्झा असद-उल्लाह बेग ख़ां उर्फ ‘गालिब’ यांच्या निधनाला २०० हून जास्त वर्ष होऊनदेखील आजही ते सर्वात जास्त प्रसिद्ध उर्दू कवी आहेत. आजच्या पिढीतील तरुणही गालिब यांचे शेर वापरतात. गालिब यांची प्रसिद्धी इतकी आहे की, उर्दूमधील प्रत्येक शेर जणू काही त्यांनीच लिहिला आहे असं समजून त्यांच्या नावे सांगितले जातात. जे शेर गालिब यांनी लिहिले नाहीत असे अनेक शेर त्यांच्या नावे ऐकवले जातात. आणि आता या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश झाला आहे.

Mirza Ghalib`s 220th birth anniversary : जाणून घ्या, काय होते मिर्झा गालिब आणि पेशव्यांचे नाते

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना नरेंद्र मोदींनी उर्दू शेर बोलून दाखवला. हा शेर गालिब यांचा असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं होतं. पण मुळात हा शेर गालिब यांनी लिहिलेलाच नाही.

‘शायद इसीलिए ग़ालिब ने कहा था कि…ताउम्र ग़ालिब ये भूल करता रहा, ताउम्र ग़ालिब ये भूल करता रहा…धूल चेहरे पर थी और मैं आइना साफ़ करता रहा’, हा शेर वाचून दाखवत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण मोदींनीही इतरांप्रमाणे गालिब यांनी शेर लिहिला असल्याचं सांगत मोठी चूक केली.

पण ही चूक करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिले नाहीत. याआधी हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार यांनीदेखील मार्च २०१२ मध्ये अर्थसंकल्प सादर करताना हाच शेर गालिब यांच्या नावे वाचून दाखवला होता. तसंच गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात दिग्दर्शक-निर्मात महेश भट्ट यांनी ट्विटरला हा शेर गालिब यांच्या नावे शेअर केला होता.