बिहारमधील प्रचारसभेत मोदींची टीका

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उर्मट असा करत, त्यांच्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे, अशा शब्दांत येथील मोदींनी त्यांच्या पहिल्याच प्रचारसभेत टीका केली.

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात गरीब व युवकांना केंद्रस्थानी ठेवत, विकासाच्या आधारेच सर्व प्रश्न सोडवता येतील, असे सांगितले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थित केलेल्या आरक्षणाबाबतच्या मुद्दय़ावर बोलण्याचे मात्र मोदींनी टाळले. बिहारला १.६५ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजवरून विरोधक आक्षेप घेत आहेत. मात्र सध्याच्या सरकारला पैसे द्यायचे काय? असा सवाल त्यांनी केला. हा निधी जरी दिला तरी नितीशकुमार इतके उद्दाम आहेत की, मोदींनी पैसे दिले म्हणून ते परत करतील. पूरग्रस्तांसाठी गुजरातने दिलेला पाच कोटी रुपयांचा निधी यापूर्वी नितीशकुमारांनी परत दिला होता याची आठवण मोदींनी करून दिली.  बिहारच्या विकासासाठी दिलेले पैसे हे जनतेचे आहेत.

सभेला व्यासपीठावर उपस्थित असलेल्या जितनराम मांझी हे तरी नितीशकुमार यांच्यावर विश्वास ठेवतील काय, असा सवाल मोदींनी विचारला. नितीशकुमार यांच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, असे त्यांनी बजावले. बिहारच्या जनतेने विकासाला मत द्यावे, असे आवाहन करत, जागतिक बँकेच्या अहवालाचा दाखला दिला. भाजपशासित झारखंड २९ व्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर आले, तर बिहार २७ व्या स्थानी राहिल्याचे मोदींनी स्पष्ट केले.