मंदसौरमध्ये शेतकरी कुटुंबाना भेटायला जाणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना पोलिसांनी निमचमध्ये रोखले आहे. मध्यप्रदेशातल्या मंदसौरमध्ये कर्जमाफी मागणारे पाच शेतकरी पोलिसांच्या गोळीबारात मारले गेले होते. या घटनेनंतर आज राहुल गांधी मोटरसायकलवरून मंदसौरमध्ये चालले होते. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले आहे.

शेतकऱ्यांच्या या अवस्थेला मोदी सरकार जबाबदार आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांशी काहीही घेणेदेणे नाही अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांना रोखण्यात आल्यानंतर त्यांनी मोदी सरकारविरोधात ट्विट करून आपला निषेध नोंदवला आहे. देशातल्या कोणत्या कायद्याचा आधार घेऊन पोलीस आणि प्रशासन मला रोखत आहेत? असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला आहे. इतकंच नाही तर जे शेतकरी गोळीबारात मारले गेले आहेत त्यांच्या कुटुबियांना माझा पाठिंबा आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेश सरकारने मला रोखण्यासाठी कसून प्रयत्न चालवले आहेत हे योग्य नाही अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे. मंदसौरमध्ये राहुल गांधी यांना जायचे होते. मात्र त्यांचे विमान मंदसौरमध्ये उतरण्यास मज्जाव करण्यात आला. ज्यानंतर राहुल गांधी  उदयपूर विमानतळावर उतरले आणि तेथून मोटरसायकलने मंदसौरमध्ये जात होते. मात्र त्यांना निमचमध्ये रोखण्यात आले आणि ताब्यातही घेण्यात आले. राहुल गांधींना बुधवारीच मंदसौरचा दौरा करायचा होता. मात्र त्यांना प्रशासनाने परवानगी नाकारली होती.

केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी राहुल गांधी फक्त प्रसिद्धीसाठी ही स्टंटबाजी करत आहेत अशी टीका केली आहे. तसेच जोवर मंदसौरमध्ये वातावरण निवळत नाही तोवर राहुल गांधींनी तिकडे जाऊ नये असाही सल्ला दिला आहे. तर शेतकऱ्यांच्या वाईट अवस्थेसाठी भाजप सरकार जबाबदार आहे अशी टीका काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी केली आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्या मंदसौर दौऱ्यावरूनही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे.