प्रजासत्ताक दिनी झालेली हिंसाचाराची घटना ताजी असतानाच दिल्लीत पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. सिंघू बॉर्डरवर स्थानिक असल्याचा दावा करत नागरिकांनी शेतकरी आंदोलकांविरुद्ध आंदोलन सुरू केलं होतं. स्थानिक आंदोलक विरुद्ध शेतकरी आंदोलक आमने-सामने आल्यानंतर संघर्षांचा भडका उडाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला असून, तणाव निर्माण झाला आहे.

दिल्लीतील वातावरण दिवसेंदिवस अशांत होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर आता दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनांच्या ठिकाणी तणाव निर्माण होत आहे. गुरूवारी गाझीपूर बॉर्डरवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आता सिंघू बॉर्डरवर आंदोलक शेतकरी आणि स्थानिकांमध्ये धुमश्चक्री झाली.

आणखी वाचा- कृषी कायदे मागे घेतले नाहीत तर आत्महत्या करेन – राकेश टिकैत

शुक्रवारी दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर मोठ्या संख्येनं स्थानिक नागरिकांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं. ‘तिरंगे का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान’च्या घोषणा देत स्थानिकांनी महामार्ग रिकामा करण्याची मागणी केली. दोन्ही बाजूंनी आंदोलन सुरू असताना अचानक वादाची ठिणगी पडली. वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली.

video : घुसखोर असल्याचं म्हणत शेतकरी नेत्याने लगावली कानशिलात

आंदोलक हिंसक झाल्यानं परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात येताच सुरक्षा जवानांनी लाठीमार करत अश्रुधूरांच्या नळकांड्या फोडल्या. जमावाला पांगवत असताना आंदोलकांनी पोलिसांवरही हल्ला केला. एका पोलीस अधिकाऱ्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला असून, हल्ला करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.