सुहेलदेव बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष ओपी राजभर यांनी जातीय दंगलीत फक्त सामान्य लोकांचाच मृत्यू का होतो ? राजकीय नेते का नाही ? असा प्रश्न विचारला असून यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अलीगडमधील एका सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी दंगलीत नेते का मरत नाहीत ? असा प्रश्न उपस्थित केला.

‘हिंदू मुस्लिम दंगलीत एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याचा कधी मृत्यू झाला का? राजकीय नेत्यांचा मृत्यू का होत नाही? धर्माच्या आधारे भांडणं लावत फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकीय नेत्यांना जिवंत जाळलं पाहिजे. यानंतरच त्यांना कळेल आणि इतरांना ‘जाळणं’ बंद करतील’, असं ओ पी राजभर यांनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशात नेहमीच भाजपा सरकारवर टीका करणाऱ्या राजभर यांनी पुढे म्हटलं की, ‘नेते हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडतात. पण आपल्या राज्यघटनेने भारताचा नागरिक असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार दिला आहे’. शनिवारी राजभर यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याची धमकी दिली होती.

राजभर यांची ही धमकी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने 2019 मध्ये भाजपाचा पराभव करण्यासाठी आघाडी केल्यानंतर आली आहे. निवडणूक एकत्रित लढवायची आहे की नाही याचा विचार करण्यासाठी राजभर यांनी भाजपाला वेळ दिला आहे. जर भाजपाकडून वेळेत उत्तर आलं नाही तर आपला पक्ष सर्व 80 जागांवर निवडणूक लढवेल असं त्यांनी सांगितलं आहे.