दिल्लीत प्रदूषण नेमके कुणामुळे होते, हा केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील वादाचा मुद्दा बनला आहे. शेजारील राज्यांमध्ये शेत जाळण्याच्या प्रकारांमुळे नव्हे तर शहरातील स्थानिक कारणांमुळे राजधानीत प्रदूषण होत असल्याची जावडेकर यांची टिप्पणी केजरीवाल यांना भलतीच झोंबली.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील प्रदूषण कमालीचे वाढले असून पंजाब आणि हरियाणात शेत जाळली जात असल्याने त्याचा धूर शहरभर पसरू लागलेला आहे. दिल्लीकरांना दरवर्षी भेडसावणाऱ्या समस्येकडे संबंधित राज्ये आणि केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचे केजरीवाल यांचे म्हणणे आहे. त्यावर, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ५० चमू दिल्लीत तैनात केले असून परिस्थितीचा आढावा घेतला जात असल्याचे जावडेकर म्हणाले. शेत जाळण्याच्या प्रकारामुळे दिल्लीत फक्त ४ टक्के प्रदूषण होते. बाकी ९६ टक्के प्रदूषण धूळ, बांधकाम, पाडकाम, रस्त्यांवरील खोदकाम अशा स्थानिक कारणांमुळे होते, अशी टिप्पणी जावडेकर यांनी केली.

जावडेकरांच्या विधानावर केजरीवाल यांनी पलटवार करत, फक्त चार टक्केच प्रदूषण शेजारच्या राज्यांमुळे होत असेल तर दोन आठवडय़ात दिल्लीतील हवा इतकी खराब कशी झाली, असा सवाल केजरीवाल यांनी केला. दिल्लीतील वास्तव केंद्र सरकार स्वीकारायला तयार नाही. या समस्येकडे दुर्लक्ष करून काही साध्य होणार नाही. गेल्या पंधरा दिवसांमध्ये स्थानिक कारणांमुळे प्रदूषण प्रचंड वाढेल असे काहीही झालेले नाही, असे उत्तर केजरीवाल यांनी दिले.

गेल्या वर्षी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, हिवाळ्यामध्ये दिल्लीच्या प्रदूषणवाढीत शेतजाळणीचा वाटा ४४ टक्के आहे. मग, केंद्रीयमंत्री ही वस्तुस्थिती कशी नाकारू शकतात, असा सवाल आपचे आमदार राघव चढ्ढा यांनी केला.