माजी क्रिकेटपटू आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यापाठोपाठ कीर्ती आझाद यांची पत्नी पूनम आझाद भाजप सोडून आम आदमी पार्टीमध्ये (आप) जाण्याची शक्यता आहे. पूनम यांच्या संभाव्य ‘आप’ प्रवेशाबाबतच्या वृत्ताची ट्विटरवरील पोस्ट कीर्ती आझाद यांनी पुन्हा ट्वीट केली. त्यावरून यासंबंधी तर्क केले जात आहेत.

भाजप नेते सिद्धू यांनी सोमवारी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ते आपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कीर्ती आझाद यांनी भाजप नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ते ‘डीडीसीए’त अधिकारपदावर असताना भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले होते. त्यावरून आझाद यांना भाजपतून काढून टाकण्यात आले होते. त्यांची पत्नी पूनम यांनी यापूर्वी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे तीन वेळा सदस्यपद भूषवले आहे.

सध्या त्या भाजपच्या दिल्ली शाखेच्या प्रवक्त्या आहेत. पण पक्षात त्यांची सर्वत्र कोंडी होत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्याही भाजपला सोडचिठ्ठी देऊन आपमध्ये जाण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्याला कीर्ती आझाद यांनी रिट्वीट केल्यामुळे खतपाणी मिळाले आहे.