16 September 2019

News Flash

ओम आणि गाय शब्द ऐकताच काहींना वाटतं देश १६व्या शतकात -मोदी

प्लास्टिकमुक्त भारत करण्याचे आवाहन

मथुरेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षेच्या मुद्यावरून विरोधकांवर हल्लाबोल केला. “या देशात ही दुर्भाग्याची गोष्ट आहे की, ओम आणि गाय हे शब्द कानावर पडले तर काही लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यांना देश पुन्हा १६व्या शतकात गेल्यासारख वाटतं. अस ज्ञान सांगणाऱ्यांनी देशाला बर्बाद केल आहे आहे”, अशी टीका मोदी यांनी विरोधकांवर केली.

दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील मथुरेचा दौरा केला. मोदी यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजनासह शेतकऱ्यांसाठीच्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण योजनेची घोषणा करत प्लास्टिक मुक्त भारतासह ‘जय किसान’चा नारा दिला.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले, “लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पहिल्यांदाच कृष्णाच्या नगरीत येण्याचे भाग्य मिळाले आहे. जनादेश मिळाल्यानंतर सरकारने तुमच्या अपेक्षेप्रमाणेच अभूतपूर्व काम करून दाखवले आहे. देशाच्या विकासासाठी तुमचे समर्थन सदैव मिळत राहिल. आज संपूर्ण विश्व पर्यावरण संरक्षणासाठी रोल मॉडलचा शोध घेत आहे. पण, भारताकडे भगवान श्रीकृष्णासारखा प्रेरणास्त्रोत आहे. ज्यांच्याशिवाय पर्यावरण प्रेमाची कल्पनाच अपूर्ण आहे”, असे मोदी म्हणाले.

“महात्मा गांधी यांची १५०वी जयंती साजरी होत असून हे वर्ष प्रेरणादायी वर्ष आहे. स्वच्छता हीच सेवा या अभियानाच्या मागे तिच भावना दडलेली आहे. आजपासून सुरू होत असलेले हे अभियान प्लास्टिक कचऱ्यापासून मुक्तीला समर्पित केले आहे. प्लास्टिकपासून निर्माण होणाऱ्या समस्या गंभीर होत चालल्या आहेत. प्लास्टिक पशुधनाच्या मृत्यूचे कारण होऊ लागले आहे. त्याचप्रमाणे नद्या आणि तलावात राहणाऱ्या प्राणी प्लास्टिक खाल्यावर जिवंत राहणे अवघड आहे. आम्हाला प्लास्टिक वापरापासून पूर्ण मुक्ती मिळवावीच लागेल. त्यासाठी २ ऑक्टोबरपर्यंत घर, कार्यालय आणि आपल्या आजूबाजूचा परिसर प्लास्टिक मुक्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे”, असे आवाहन मोदी यांनी यावेळी केले. मोदी यांनी गोरक्षेच्या मुद्यावरून सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांचाही समाचार घेतला. “या देशात ही दुर्भाग्याची गोष्ट आहे की, ओम आणि गाय हे शब्द कानावर पडले तर काही लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो. देश पुन्हा १६व्या शतकात गेल्यासारख त्यांना वाटत. अस ज्ञान सांगणाऱ्यांनी देशाला बर्बाद केल आहे आहे”, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाविषयी बोलताना मोदी म्हणाले, “आज राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण योजनेची सुरूवात करण्यात आली आहे. पशुधनाच आरोग्य, पोषण, दूग्ध उद्योग आणि अन्य योजनाही सुरूवात करण्यात आली आहे. पर्यावरण व विकासाचे संतुलन राखण्यासाठी कृषि आणि पशुपालनाला प्रोत्साहन दिले जात आहे. पर्यावरण आणि पशुधनाशिवाय आपली दैवत जसे अपूर्ण दिसतात, तिच अपूर्णता आपल्याला भारतात दिसेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात पशुपालन आणि इतर व्यवसायांचा मोठा वाटा आहे. पशुपालन, मत्स्यपालन अथवा मधमाशी पालन यामध्ये केलेली गुंतवणूक जास्त मोबदला देते. गेल्या पाच वर्षात सरकारने शेतीशी निगडीत दुसऱ्या पर्यांयावर नव्या दृष्टिकोनातून काम सुरू केले आहे”, असेही मोदी म्हणाले.

First Published on September 11, 2019 1:56 pm

Web Title: prime minister modi chanting jai jawan jai kisan at mathura bmh 90