काही दिवसांपूर्वी ब्रिटीश राजघराण्यात नव्या पाहुण्याचे आगमन झाले. प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांना कन्यारत्न झाले आहे. मेगनने मुलीला जन्म दिला आहे. या मुलीचे नाव लिलिबेट डायना ठेवलं आहे. यापूर्वी २०१९ साली या जोडप्याला पुत्ररत्न झाले. त्याचे नाव आर्ची असे आहे. आता प्रिन्स चार्ल्स यांनी आपल्याला राजेपद मिळाल्यानंतर प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्या मुलाला म्हणजे आर्चीला ‘प्रिन्स’ या रॉयल टायटलनं गौरवणार नसल्याचे म्हटले आहे.

अमेरिकी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सध्या ब्रिटीश राजघराण्यात सुरु असलेल्या वादामुळे चार्ल्स यांनी हा निर्णय घेतला आहे. राजघराण्यात अशा टायटल्स किंवा पदवींच्या संख्येवर मर्यादा आणण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. कारण जनतेला अधिक आटोपशीर व सुटसुटित अशी राजेशाही हवी असल्याचं मत त्यांनी केलं आहे. हॅरी आणि मेगन यांचा मुलगा आर्ची हा राजघराण्याच्या गादीवर बसण्यासाठी सातव्या क्रमांकावर आहे. राजघरण्यातील ‘प्रिन्स’ आणि ‘प्रिन्सेस’ ही पदवी बहाल केलेल्यांना जनतेच्या खर्चातून प्रचंड मानधन आणि सुरक्षा पुरवण्यात येते. याआधीही जाहीर झालेल्या माहितीनुसार हॅरी आणि मेगनने आर्चीसाठी सुरक्षितता नाकारली आहे.

१९ मे २०१८ रोजी प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांचा शाही विवाह झाला होता. २०१९ साली या जोडप्याला पुत्ररत्न झाले. त्याच्या पुढच्या वर्षी या जोडप्याने राजघराणे सोडत असल्याचे जाहीर केले. ९ जानेवारी २०२० रोजी या दोघांनी राजघराणे सोडले आणि अमेरिकेत वास्तव्यास आले. त्यानंतर एका टिव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राजघराण्यावर वंशभेदाचा आरोप केला होता. राजघराणं त्यांचा मुलगा आर्चीला प्रिन्स बनवू इच्छित नव्हते. कारण त्याचा वर्ण काळा असेल अशी भीती त्यांना होती. आर्चीच्या जन्मापूर्वी राजघराण्याने प्रिन्स हॅरीसोबत याबाबत चर्चाही केली होती, असे त्यांनी मुलाखती दरम्यान सांगितले होते. त्याचबरोबर राजघराणे एका तुरुंगासारखे असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रिन्स चार्ल्स यांनी आर्चीला राजघराण्याचे ‘प्रिन्स’पद देण्यास नकार दिला आहे.