पर्यटनमंत्री आजगावकर यांचे वक्तव्य

पणजी : गोव्यातील नोकऱ्यांमध्ये परप्रांतीय, विशेषत: महाराष्ट्रातील लोकांना स्थान दिले जाणार नाही तर केवळ गोव्यातील लोकांनाच प्राधान्य दिले जाईल, असे गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी सांगितले. त्यांच्या या भूमिपुत्र भूमिकेमुळे वाद निर्माण झाला आहे.

गोव्यात स्थलांतरित कामगारांना स्थान मिळणार नाही. विशेष करून महाराष्ट्रातील लोकांना नोकऱ्या दिल्या जाणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले. मंगळवारी एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली.

बंदरे स्वच्छ करण्याच्या कंत्राटाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्याला कुणाला या निविदा प्रक्रियेत यश येऊन काम मिळेल त्याने गोव्यातील लोकांना नोकरीत प्राधान्य दिले पाहिजे. महाराष्ट्रातील लोक येथे येता कामा नयेत.

त्यांनी याबाबत विशिष्ट शब्द वापरल्यावर तो बदनामीकारक आहे असे काही पत्रकारांनी त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यावर ते म्हणाले, की हा काही वाईट शब्द नाही. याचा अर्थ जे लोक घाटावर राहतात ते लोक एवढाच आहे.

आजगावकर यांनी २०१७ मध्ये कर्नाटकातील लमाणी लोकांबाबत असेच वक्तव्य करून वाद ओढवला होता. लमाणी लोक गोव्यातील किनाऱ्यांवर उपद्रव निर्माण करतात असे  त्या वेळी ते म्हणाले होते. त्यावरून आदिवासी नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.