देशात सातत्याने सुरू असलेल्या इंधन दर वाढीच्या मुद्द्यावरून काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

”भाजपा सरकारला आठवड्यातील त्या दिवसाचं नाव ‘अच्छा दिन’ करायला हवं ज्या दिवशी डिझेल-पेट्रोलच्या दरात वाढ होणार नाही. कारम वाढत्या महागाईच्या काळात अन्य दिवस तर सर्वसामान्यांसाठी ‘महंगे दिन’ आहेत.” असं प्रियंका गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील इंधन दर वाढीवरून मोदी सरकारवर टीका केलेली आहे. त्यांनी महागाईच्या संबंधातील सर्व हेडलाइन्सचा एक फोटो शेअर करत, महागाईचा विकास असं ट्विट केलं आहे. तर, रॉबर्ट वढेरा यांनी देखील ट्विट करत हे जाहीर केलं आहे की, जोपर्यंत इंधन दर कमी होत नाही तोपर्यंत ते आपल्या कार्यालयात सायकलने जातील.

‘वो जुमलों का शोर मचाते हैं, हम…’, पेट्रोल-डिझेल दरवाढीवर राहुल गांधींची शेरोशायरी!

तर,  ‘जून २०१४मध्ये भाजपचं सरकार आलं, तेव्हा कच्च्या तेलाच्या किंमती ९३ डॉलर प्रतिबॅरल होत्या. तेव्हा पेट्रोल ७१ तर डिझेल ५७ रुपये प्रतिलिटर होतं. गेल्या ७ वर्षांत कच्चं तेल ३० डॉलरने स्वस्त झालंय. पण तरीही पेट्रोल सेंच्युरी करतंय आणि डिझेल त्याच्या पाठपाठ जातंय’, असं राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं होतं. ‘२०२१मध्ये १९ वेळा ही दरवाढ झाली आहे. १५ फेब्रुवारी २०२० ते १५ फेब्रुवारी २०२१ या काळात पेट्रोल १७.०५ तर डिझेल १४.५८ रुपयांनी महाग झालं आहे’, अशी आकडेवारी देखील त्यांनी सादर केली होती.