प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशावर अनेकांनी भारतीय राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसने सोडलेले हे ब्रह्मास्त्र आहे, अशा शब्दांत माध्यमांनी चर्चा सुरु केली आहे. यापार्श्वभूमीवर सध्याच्या भारतीय राजकारणातील चाणक्य मानले जाणारे जनता दल युनायटेडचे (जदयू) उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. किशोर यांनी यापूर्वी काँग्रेसचे निवडणूक रणनीतीकार म्हणूनही काम पाहिले आहे.

किशोर म्हणाले, प्रियंका गांधींचे काँग्रेसमध्ये सक्रिय होणे ही मोठी बातमी आहे. यामुळे लोकसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढणार आहे. मात्र, इतक्यात त्यांच्या राजकारणातील प्रवेशावर टिप्पणी करणे घाईचे ठरेल. कारण त्यांनी आत्ताच राजकारणात सुरुवात केली आहे. त्यामुळे अगदीच नवख्या असल्याने त्यांची थेट पतंप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर देणारा नेता असे भाकित करण्याला अर्थ नाही. मात्र, प्रियंका गांधी या तीन वर्षांपूर्वीच सक्रिय राजकारणात आल्या असत्या तर २०१७ मध्ये उत्तर प्रदेशातील निवडणुकांवर मोठा परिणाम पहायला मिळाला असता.

जर देशातील एक जुना पक्ष म्हणून काँग्रेसने केवळ प्रियंका गांधींनाच नव्हे तर इतर कोणालाही पक्षातील मोठ्या बदलाच्या हेतूने राजकाणात आणले असते तेही अगदीच कमी कालावधीत तरी ते कितपत न्याय ठरेल. कारण प्रियंका गांधी यांना किमान दोन-तीन वर्षांचा राजकारणातील अनुभव घेऊ द्यायचा होता त्यानंतर देशातील लोकांनी ठरवलं असतं की त्या पक्षामध्ये जबाबदाऱ्या घेण्यास सक्षम आहेत किंवा नाही, असेही किशोर यांनी म्हटले आहे.

प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांची तुलना करणेही चुकीचे असल्याचे किशोर यांनी म्हटले आहे. कारण २० वर्षांपासून राजकारणात असलेल्या व्यक्तीशी आत्ताच राजकारणात प्रवेश केलेल्या व्यक्तीची तुलना करणे हे चुकीचे आहे. मात्र, आता प्रियंका यांनी राजकारणात प्रवेश केला आहे आणि त्या माघार घेणार नाहीत. कारण त्यांच्यासारखे लोक केवळ एका निवडणूकीसाठी राजकारणात येत नाहीत.