लोकसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेप्रसंगी नरेंद्र मोदी यांच्याविरोधी फेसबुकवर प्रतिक्रिया नोंदविणाऱ्या तरुणावर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा राजकीय पक्षांनी  निषेध केला आहे.
लवू चोडणकर असे या तरुणाचे नाव असून त्याची दंडाधिकारीय चौकशी करण्यासाठी गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने न्यायालयात धाव घेतली आहे. राज्यात मोठय़ा प्रमाणावर जातीय आणि सामाजिक तणाव निर्माण व्हावा म्हणून चोडणकर याने फेसबुकवर व्यापक अपप्रचार मोहीम सुरू केली असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
दरम्यान, सायबर गुन्हे विभागाशी संबंधित तज्ज्ञ डॉ. समीर केळेकर आणि आम आदमी पार्टीने शनिवारी या कारवाईचा निषेध करून येथील पोलीस मुख्यालयासमोर धरणे धरले.
चोडणकर याने २३ मार्च रोजी लॅपटॉपवर टाकलेल्या संदेशाचा शोध पोलीस घेत आहेत, परंतु पोलिसांनी १२ मे रोजी त्याच्याविरोधात समन्स जारी केले आहे, याकडे केळेकर यांनी लक्ष वेधले. केवळ चोडणकर याला त्रास देण्यासाठीच पोलिसांनी त्याच्याविरोधात प्राथमिक आरोपपत्र (एफआयआर) दाखल केले आहे, असाही आरोप त्यांनी केला.
दरम्यान, या तपासकामात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होत असल्याची शक्यता मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी फेटाळून लावली.