पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला टोला लगावला. पुलवामा हल्ल्याच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळणारच, हा नवीन धोरण राबवणारा भारत आहे हे पाकिस्तानने विसरु नये. दहशतवादी संघटनांनी आणि त्याच्या म्होरक्यांनी क्रौर्य दाखवले, त्याचा हिशेब चुकता करु, असे नरेंद्र मोदी यांनी पाकला सुनावले आहे.

झाशी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध कामांचे लोकार्पण केले. यानंतरच्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी पुलवामा येथील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानवर निशाणा साधला. आज देशात शोककळा पसरली आहे. तुमच्या सर्वांच्या मनातील भावना मी समजू शकतो. आपल्या जवानांनी देशासाठी बलिदान दिले आणि त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असे आश्वासन मोदींनी दिले.

पुढील कारवाई कुठे करावी, त्याची वेळ काय असणार आणि ठिकाण कोणते असेल, त्याचे स्वरुप काय असेल, हे ठरवण्याची जबाबदारी आम्ही सैन्याकडेच सोपवली आहे, असे मोदींनी सांगितले. पुलवामामधील गुन्हेगारांना शिक्षा मिळणारच. हा नवीन विचारधारा आणि धोरण राबवणारा देश आहे, हे पाकने विसरु नये, असेही त्यांनी पाकला सुनावले.

बुंदेलखंडला देशाच्या सुरक्षा आणि विकासाचे कॉरिडोर बनण्याचे अभियान सुरु केले आहे. झाशी ते आग्रा या कॉरिडोरमुळे बुंदेलखंड आणि उत्तर प्रदेशमधील तरुणांना रोजगाराची संधी मिळणार, असा दावाही त्यांनी भाषणात केला. जेव्हा मोठे उद्योगधंदे सुरु होतात, त्यावेळी त्या भागात छोटे उद्योगधंदेही सुरु होता. या कॉरिडोरचा उद्योग क्षेत्राला खूप फायदा होईल, असे त्यांनी नमूद केले.