सौदी अरेबियाच्या महिलेस दिलासा

कुटुंबीयांनी छळ केल्याने थायलंडला पळून आलेल्या सौदी अरेबियन महिलेस अखेर कॅनडाने आश्रय दिला आहे. शुक्रवारी रात्री कॅनडाने हा निर्णय जाहीर केला. रहाफ महंमद अलकुनन असे या महिलेचे नाव असून ती कुवेत दौऱ्यावर असताना कुटुंबीयांच्या मोटारीतून उतरली व बँकॉकला आली होती. तिथे तिला अडवण्यात आले, तसेच विमानतळावर डांबून ठेवण्यात आले.

तिला नंतर मायदेशी परत पाठवण्यात येणार होते त्याविरोधात तिने याचिका दाखल केली. पण ती फेटाळण्यात आल्यामुळे तिला पुन्हा कुवेतमध्ये पाठवण्यात येणार होते. ती मूळ सौदी अरेबियाची असून तेथे कुटुंबीयांनी तिचा छळ केला होता.

बँकॉकला पळून आल्यानंतर तिने आश्रय मागितला होता, पण थायलंडने आश्रय नाकारला होता. अशी अनेक प्रकरणे असून महिलांना कुणी वाली नाही असे मानवी हक्क कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. अलकुनन ही सोल मार्गे टोरांटोला जाणार आहे, अशी माहिती थायलंडच्या स्थलांतर विभागाचे पोलिस प्रमुख सुराचेट हाकपर्ण यांनी दिली.

कॅनडाच्या पंतप्रधानांची घोषणा

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन थ्रुडो यांनी तिला आश्रय देत असल्याचे जाहीर केले. महिला हक्कांसाठी कॅनडा नेहमीच अग्रेसर असून या अवघड प्रसंगी सदर महिलेच्या पाठीशी उभे राहणे आमचे काम असून संयुक्त राष्ट्रांनी तिला आश्रय देण्याची केलेली विनंती आम्ही मान्य केली आहे. तिने कॅनडाची निवड केली हा तिचा व्यक्तिगत पर्याय होता असे थ्रुडो यांनी सांगितले.

मदत करणाऱ्या सर्वांचे आभार

कॅनडाच्या राजदूतांनी तिला  थायलंडमध्ये निरोप दिला तेव्हा ती सुखी व समाधानी दिसत होती. तिने मदत करणाऱ्या सर्वाचे आभार मानले आहेत. तिला कॅनडात आल्यानंतर भाषा शिकावी लागणार आहे, तिला अरबीशिवाय थोडेफार इंग्रजीही येते, अशी माहिती हे प्रकरण हाताळणाऱ्या यंत्रणांतील सुत्रांनी दिली.