देशातला करोनाचा कहर वाढतच चालला आहे. वैद्यकीय यंत्रणेवर, प्रशासनावर आलेल्या ताणामुळे अनेक सोयीसुविधांचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे भारताने परदेशातून मदत मागवली आहे. ह्या मदतीबद्दलच आता राहुल गांधींनी भारत सरकारला ५ प्रश्न विचारले आहेत.

आपल्या ट्विटमध्ये राहुल यांनी हे प्रश्न विचारले आहेत. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,

“आत्तापर्यंत भारताला कोणकोणत्या गोष्टींचा पुरवठा झाला?

त्या गोष्टी कुठे आहेत?

त्याचा फायदा कोणाला होत आहे ?

त्यांचं राज्यांना कशा पद्धतीने वाटप झालं आहे?

या सगळ्यात पारदर्शकता का नाही? ”

राहुल गांधींनी भारत सरकारला या प्रश्नांची उत्तरेही मागितली आहेत. भारत सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे देशासमोर आता लॉकडाउन करण्याशिवाय अन्य पर्याय उरलेला नाही असंही त्यांनी मागेच सांगितलं होतं.

देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. गेल्या साधारण दोन आठवड्यांपासून देशात दररोज तीन लाखांच्या वर करोना रुग्ण आढळून येत आहेत. देशातल्या अनेक राज्यांमध्ये अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, ओडिशा, उत्तरप्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनचे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तर अनेक राज्यांमध्ये विकेंड लॉकडाउन, रात्रीची संचारबंदीही लागू करण्यात आली आहे.