गेल्या काही दिवसांपासून अयोध्येतील राम जन्मभूमीप्रश्नी रोज नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. आता भाजपने याप्रकरणात राहुल गांधींना ओढल्याचे दिसते. अयोध्येतील राम जन्मभूमीप्रकरणी शिया वक्फ बोर्डचा प्रस्ताव चांगला असल्याची प्रतिक्रिया भाजपने दिली असून आता याप्रश्नी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मौन सोडून आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डने सोमवारी राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद संपुष्टात आणण्यासाठी अयोध्येत वादग्रस्त जागेवर राम मंदिर तर लखनऊ येथे ‘मस्जिद ए अमन’ तयार करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी याचा मसुदा दि. १८ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयात सोपवण्यात आला आहे. भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहा राव यांनी याप्रकरणी राहुल गांधींना राम जन्मभूमीबाबत त्यांचे मत विचारले आहे.

राममंदिर प्रकरणात पाकिस्तानकडून अडथळे: शिया वक्फ बोर्ड

शिया वक्फ बोर्डने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून अयोध्येत राम मंदिर आणि लखनऊत मशीद उभारण्याचा प्रस्ताव चांगला असल्याचे राव यांनी म्हटले. राजकोट येथे भाजप उमदेवाराच्या प्रचारासाठी आल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली.

भाजपचे मत स्पष्ट आहे, अयोध्येत भगवान रामाचे भव्य मंदिर बनावे. पण काँग्रेसला काय हवं आहे. राहुल गांधी यांनी याप्रकरणी मौन सोडावी अशी आमची मागणी असून त्यांनी अयोध्येप्रश्नी आपले मत मांडावे, असे त्यांनी म्हटले. आम्ही शिया वक्फ बोर्डच्या प्रस्तावाचे समर्थन करतो पण काँग्रेसकडूनही त्यांचे उत्तर आम्हाला जाणून घ्यायचे आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, राम मंदिरप्रश्नी पाकिस्तान अडथळा आणत असल्याचा आरोप शिया वक्फ बोर्डचे अध्यक्ष सईद वसिम रिझवी यांनी केला असून त्याचाच एक भाग म्हणून लष्कर ए तोएबाने २००५ मध्ये राम जन्मभूमीवर हल्ला केला होता, असा दावा त्यांनी केला.