अन्नसुरक्षा विधेयकावर मतदान करता न आल्याने सोनियांना अश्रू आवरले नाहीत. यामागे राजकारण नाही तर सामान्यांच्या प्रती असलेली आदराची भावना आहे. आपल्याला अशाच नव्या राजकीय संस्कृतीची सुरुवात करायची असल्याची भावनिक साद काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी येथील आदिवासी मेळाव्यात घातली.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रचाराने गती घेतली असून राहुल गांधी यांनी सभेत भाजपवर टीकास्त्र सोडले. अन्नसुरक्षा विधेयक संमत होईपर्यंत आपण संसद सोडणार नाही, असे सोनियांनी सांगितले. प्रकृती बरी नसताना त्या डॉक्टरांकडे जात नाहीत, त्यामुळे आपण मुलगा म्हणून काहीसे रागावलो. अखेर या विधेयकाच्या वेळी मतदान होण्यापूर्वी डॉक्टरांकडे जाण्याचे त्यांनी मान्य केले; त्या वेळी सोनियांच्या डोळ्यांत अश्रू होते.त्या वेळी हे काय आहे? असे आपण विचारल्यावर ज्या विधेयकालाही मी संघर्ष केला, त्यासाठी मतदान करण्याची आपली इच्छा होती, असे सोनियांनी सांगितले. संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ यांनी विधेयक संमत होईल असे आश्वासन सोनियांना दिले, तेव्हाच त्या संसद सोडून उपचारांसाठी जाण्यास तयार झाल्याचे राहुल म्हणाले. उपाशीपोटी झोपणाऱ्या लाखो लोकांचे अश्रू पुसणे सोनियांना महत्त्वाचे वाटते.