भविष्यात लवकरच राहुल गांधी दिल्लीतील लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतील, असे भाकीत पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी केले आहे. नुकत्याच तीन राज्यात झालेल्या काँग्रेसच्या दणदणीत विजयाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले आहे.

सिद्धू म्हणाले, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर राहुल भाई भविष्यात लवकरच लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतील अशी मला खात्री वाटते.

स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचे पंतप्रधान दरवर्षी राष्ट्रध्वज फडकवतात आणि देशाला उद्देशून भाषण करतात. पुढील वर्षी लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर नवे पंतप्रधान त्यानंतर येणाऱ्या स्वातंत्यदिनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतील. लोकसभा निवडणूक एप्रिल-मे २०१९ दरम्यान होणार आहे.

सिद्धू म्हणाले, पाच राज्यांपैकी तीन राज्यांमध्ये काँग्रेसला विजय मिळवणे शक्य झाले कारण राहुल गांधींनी पक्ष कार्यकर्त्यांमध्ये विजयाची तीव्र भावना निर्माण केली. त्यामुळे सर्व कार्यकर्ते त्यांची प्रशंसा करीत आहेत. प्रत्येक रस्त्यावरील प्रत्येक कार्यकर्ता आणि त्यांच्या शेजारीपाजाऱ्यांमध्ये देखील आनंद आहे. हे तीन विजय देशाचे भविष्य बदलून टाकतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.