मोदी सरकारच्या विविध मोहिमांबाबतीत विचारलेल्या प्रश्नांवर बंगळुरूतील माऊंट कार्मेल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या सकारात्मक उत्तरांमुळे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना बुधवारी नाचक्कीला सामोरे जावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोंडीत पकडण्यासाठी राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना केलेला प्रश्न त्यांच्यावरच उलटला.

मोदी सरकारचे वाभाडे काढत राहुल यांनी आपल्या भाषणादरम्यान विद्यार्थ्यांना मोदींचे स्वच्छ भारत अभियान यशस्वी ठरत आहे का? असा प्रश्न विचारला असता विद्यार्थ्यांनी होकारार्थी उत्तर दिल्याने राहुल यांची पंचाईत झाली. विद्यार्थ्यांच्या उत्तरामुळे राहुल गांधी क्षणभर निरुत्तर झाले. त्यानंतर त्यांनी आपली बाजू सावरत मला असं वाटत नसल्याचे सांगत सारवासारव केली.

राहुल यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारवर चौफेर टीका करत हे सूटा-बूटांचे सरकार सर्व पातळीवर नापास ठरत असल्याचे सांगितले. सध्याच्या सरकारमध्ये एकच माणूस सर्व निर्णय घेतो. पण, जनतेच्या प्रश्नांना पण, देशातील समस्यांवर या व्यक्तीकडे उत्तरे नाहीत, असा टोला देखील राहुल यांनी मोदींना लगावला. याच वेळी राहुल यांनी मोदींना कोंडीत पकडण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू केले. त्यावर विद्यार्थ्यांकडून मोदी सरकारच्या मोहिमांवर सकारात्मक उत्तरे आल्याने राहुल यांना धक्काच बसला. स्वच्छ भारतवरील प्रश्नानंतर त्यांनी मेक इन इंडियाबाबतही विद्यार्थ्यांना देशात ‘मेक इन इंडिया’ यशस्वी होताना दिसत आहे का? अशी विचारणा केली. त्यावरही विद्यार्थ्यांनी होकारार्थी उत्तर दिल्याने राहुल यांची भंबेरी उडाली.