राफेल लढाऊ विमानावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला सळो की पळो करुन सोडले आहे. भाजपाकडून राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्नही केला जात आहे. यातच भाजपाचे राजस्थानचे मंत्री जसवंत सिंह यादव यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. राफेल विमान पाकिस्तानला न मिळाल्यामुळे राहुल गांधी नाराज आहेत. अत्यंत कठोर परिश्रमानंतर भारताला राफेल मिळाले आहे. पाकिस्तानला ते मिळू शकले नाही. त्यामुळे राहुल गांधी कमालीचे त्रासले आहेत. मोदीजींना हा व्यवहार करता आला आणि पाकिस्तानला ही विमाने मिळवण्यात अपयश आले. हे राहुल गांधींना सहन होत नसल्याचे वक्तव्य जसवंत सिंह यांनी केले आहे.

यादव पुढे म्हणाले, राहुल गांधी पाकिस्तानला खूश करण्यासाठी हिंदुंचा अपमान करतात. ते (राहुल गांधी) म्हणतात की, हिंदू दहशतवादी आहेत. असा माणूस पंतप्रधान बनून काय करेल ? ते भारतातील लोकांनाच सांगतात की, हिंदू दहशतवादी आहेत. याचा अर्थ काय आहे ? जर तुम्हाला पाकिस्तानला खूश करायचे आहे तर तुम्ही आम्हाला का अपमानित करत आहात ?

दरम्यान, राहुल गांधी फ्रान्सबरोबर राफेल विमान करारावरुन सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना दिसत आहेत. या व्यवहारामुळे सरकारी खजिन्याला ४१२०५ कोटी रुपयांचा फटका बसला असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. हा संशयित व्यवहार असल्याचे राहुल गांधींचे मत आहे. हा व्यवहार मोदींशी जवळीक असलेल्या दिवाळखोर उद्योगपतींसाठी केल्याचा गंभीर आरोपही राहुल गांधी करत असतात.