राजस्थानातील सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला आहे. विधानसभा अध्यक्षांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकीय कुरघोड्यांवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र पाठवलं आहे. त्यामुळे जयपूरमध्ये सुरू असलेलं राजस्थानातील सत्ता नाट्य आता थेट दिल्लीपर्यंत पोहोचलं आहे.

राजस्थानातील काँग्रेसचं सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपा करत असल्याचा आरोप सर्वप्रथम मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला होता. त्यानंतर सचिन पायलट आणि गेहलोत यांच्यातील आपसातील मतभेद टोकाला गेले. मागील आठवडाभरापासून राजस्थानात सत्ता नाट्य रंगल असून, आता ते दिल्लीपर्यंत पोहोचलं आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. “राजस्थानमध्ये लोकशाही पद्धतीनं सत्तेवर आलेल्या सरकार घोडेबाजाराच्या माध्यमातून पाडण्याचा प्रयत्न होत असल्याच्या मुद्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छित आहे. आपल्याकडे बहुपक्षीय पद्धती असल्यानं केंद्र व राज्यात वेगळ्या पक्षांची सरकारं निवडून येतात, हेच आपल्या लोकशाहीचं सौदर्यं आहे. करोना महामारीच्या काळात लोकांचे जीव वाचवणे हीच आमची प्राथमिकता आहे, पण अशात राजस्थान निवडून आलेलं सरकार पाडण्यात प्रयत्न केले जात आहे,” असं गेहलोत यांनी म्हटलं आहे.

“सरकार पाडण्याच्या या कृत्यात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, भाजपाचे इतर नेते आणि आमच्या पक्षातील काही अतिमहत्वकांक्षी नेतेही सहभागी आहेत. यातील भंवरलाल शर्मांसारख्या वरिष्ठ नेत्यानं घोडेबाजार करून स्व. भैरोसिहं शेखावत यांचं सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. पैसेही अनेक आमदारांपर्यंत पोहोचले होते. पण, मी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं तत्कालिन राज्यपाल बल्लिराम भगत आणि पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांना व्यक्तिशः भेटून याचा विरोध केला होता. अशाप्रकारे लोकशाही मार्गानं निवडणून आलेली सरकार पाडण लोकशाही विरोधात आहे. असं षडयंत्र सर्वसामान्य माणसासोबत विश्वासघात आहे,” असं गेहलोत यांनी पत्रात म्हटलं आहे.

“मला या गोष्टीचं नेहमी वाईट वाटेल की, जेव्हा सामान्य माणसांचा उदरनिर्वाह वाचवण्याची जबाबदारी केंद्र व राज्य सरकारची असताना केंद्रात सत्तेत असलेला पक्ष करोना नियंत्रणाची प्राथमिकता सोडून राज्यातील सरकार पाडण्यासाठी मुख्य भूमिका पार पाडत होता. असेच आरोप करोना काळात मध्य प्रदेशात सरकार पाडण्यावेळी झाले होते. त्याचबरोबर तुमच्या पक्षांची देशभर बदनामी झाली होती. मला माहिती नाही, याची किती माहिती आपल्याला आहे की दिशाभूल केली जात आहे. अशा कृत्यात सहभागी असलेल्या इतिहास कधीही माफ करणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे की सत्याबरोबर लोकशाही परंपरा व संविधानीक मूल्यांचा विजय होईल आणि आमचं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल,” असं गेहलोत यांनी म्हटलं आहे.