राजस्थानमधील राजकारणात नाट्यमय घडामोडी सुरु असून सध्या एका ऑडिओ क्लिपमुळे खळबळ माजली आहे. राजस्थानमध्ये आमदारांचा घोडेबाजार सुरु असल्याचा आरोप होत असतानाच ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामुळे आतापर्यंत सचिन पायलट यांनी पुकारलेलं बंड, काँग्रेसकडून आमदारांना नोटीस यावरुन सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरुन सुरु असलेलं राजकारण या ऑडिओ क्लिपकडे वळलं आहे. पुढील काही दिवस हा विषय चांगलाच वाढण्याची शक्यता आहे.

काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये?
गुरुवारी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस आमदारामध्ये झालेल्या चर्चेच्या तीन ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. या ऑडिओ क्लिपमध्ये काँग्रेस सरकार पाडण्यासंबंधी चर्चा सुरु आहे. ऑडिओ क्लिपमधील आवाज केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि काँग्रेस आमदार भवरलाल शर्मा यांचा असल्याचा दावा आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये अजून एक व्यक्ती आहे जो आमदारांना आपल्यासोबत घेण्यासंबंधी बोलत आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये सरकारला गुडघ्यांवर आणण्याचीही चर्चा सुरु आहे. सोबतच हॉटेलमध्ये आठ दिवस थांबण्याबद्दलही बोललं जात आहे. यावेळी मंत्री पैशांसंबंधी विचारतात तेव्हा समोरील व्यक्ती जे आश्वासन दिलं आहे ते पूर्ण केलं जाईल आणि वरिष्ठतेसंबंधीही काळजी घेतली जाईल असं सांगत आहे.

आणखी वाचा- राजस्थान षडयंत्र: ऑडिओ क्लिपमुळे खळबळ, काँग्रेसकडून दोन आमदारांवर कारवाई

ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भवरलाल शर्मा यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून हे काँग्रेस सरकारचं षडयंत्र असून आपल्या आमदारांवर दबाव आणण्यासाठी हे सर्व केलं जात असल्याचा आरोप केला आहे.

आणखी वाचा- राजस्थान: “काँग्रेस व्हेंटिलेटरवर, प्लाझ्मा किंवा रेमडेसिवीरही त्यांना वाचवू शकत नाही”

दरम्यान स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपने (SOG) दखल घेतली असून ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख असणाऱ्या संजय जैन यांना ताब्यात घेतलं होतं. प्रकरण गंभीर असल्याने काही फक्त तीन अधिकारी तपास करत असून संजय जैन यांच्या चौकशीसंबंधी माहिती फक्त त्यांच्याकडे आहे. सत्यता पडताळल्यानंतरच गुन्हा दाखल केला जाईल असं एसओजी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.