सचिन पायलट यांना काँग्रेसने उपमुख्यमंत्री तसंच प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवलं असून लवकरच ते भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा आहे. सचिन पायलट यांच्यासाठी भाजपाची दारं खुली असल्याचंही अनेक नेते म्हणत आहेत. दरम्यान सचिन पायलट यांनी आपल्या पुढील वाटचालीसंबंधी बोलताना भाजपामध्ये प्रवेश करणार की नाही हेदेखील स्पष्ट केलं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

“आपण अद्यापही काँग्रेसमध्ये असून पुढे काय करायचं याचा निर्णय समर्थकांशी चर्चा करुनच घेतला जाईल,” असं सचिन पायलट यांनी सांगितलं आहे. भाजपामध्ये प्रवेश करणार का ? असं विचारण्यात आलं असता सचिन पायलट यांनी आपण असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं स्पष्ट केलं. आपण लोकांसाठी काम करत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

सचिन पायलट यांनी काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या ज्योतीरादित्य शिंदे तसंच इतर काही नेत्यांची भेट घेतल्याची चर्चा होती. यावर बोलताना सचिन पायलट यांनी, आपण कोणत्याही भाजपा नेत्याची भेट घेतली नसून ज्योतीरादित्य शिंदे यांना गेल्या सहा महिन्यांपासून भेटलो नसल्याचं सांगितलं आहे. आपण कोणत्याही भाजपा नेत्याच्या संपर्कात नसल्याचं सचिन पायलट यांनी म्हटंलं आहे.

…म्हणून मी बंड पुकारलं, सचिन पायलट यांनी पहिल्यांदाच केलं जाहीर भाष्य

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांनी भाजपासोबत मिळून सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. अशोक गेहलोत यांच्या आरोपांवर बोलताना सचिन पायलट यांनी त्यामध्ये काही सत्यता नसून, राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी आपण खूप मेहनत घेतली असल्याचं सांगितलं आहे. मग मी पक्षाविरोधात काम का करेन ? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

“पाच वर्ष पक्षासाठी झटलो, पण गेहलोत मुख्यमंत्री झाले”, सचिन पायलट यांनी व्यक्त केली जाहीर नाराजी

तुमच्यासाठी मुख्यमंत्री होणं इतकं महत्त्वाचं का आहे? असं विचारण्यात आलं असता सचिन पायलट यांनी सांगितलं की, “हे मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी नाही आहे. २०१८ मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर मी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता हे खरं आहे. पक्षाच्या फक्त २१ जागा असताना मी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतली होती. मी लोकांसोबत काम करत असताना पाच वर्षात अशोक गेहलोत यांनी तोंडातून एक शब्दही काढला नाही. पण पक्षाचा विजय होताच अशोक गेहलोत यांनी अनुभवाच्या आधारे मुख्यमंत्रीपदावर दावा केला. पण त्यांचा अनुभव काय आहे ? १९९९ आणि २००९ असं दोन वेळा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं. २००३ आणि २०१३ च्या निवडणुकीत त्यांना पक्षाच्या जागा ५६ आणि २६ वर आणल्या होत्या. तरीही त्यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री करण्यात आलं”.

“२०१९ लोकसभा निवडणुकीत अशोक गेहलोत यांनी पक्षाला जास्तीत जागा मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण त्यांच्या मतदारसंघातही उमेदवार निवडून आणू शकेल नाहीत. हा त्यांचा अनुभव आहे. पण तरीही मी राहुल गांधी यांचा त्यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय मान्य केला. मी नाराज असतानाही राहुल गांधी यांनी आग्रह केल्याने उपमुख्यमंत्रीपद घेतलं. राहुल गांधी यांनी कामात आणि सत्तेत योग्य वाटा देण्यास सांगितलं होतं. पण तरीही अशोक गेहलोत यांनी आपला अजेंडा तयार केला आणि माझा अपमान करत लोकांसाठी काम करण्यापासून रोखत राहिले,” असंही सचिन पायलट यांनी  सांगितलं आहे.