सरकारी नोक ऱ्यात पाच टक्के आरक्षणासाठी गुज्जर समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस होता. आंदोलकांनी राज्य सरकारचा चर्चेचा प्रस्ताव फेटाळून आंदोलन सुरूच ठेवले आहे. शेकडो लोकांनी दिल्ली-मुंबई मार्गावर ठिय्या दिला व रेल्वे वाहतूक रोखून धरली.
अनेक रेल्वेगाडय़ा दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या. दरम्यान भरतपूर-हिंदाऊन रस्त्यावरील वाहतूकही विस्कळीत झाली आहे. राज्य सरकारने गुज्जर नेत्यांना एक पत्र पाठवले असून त्यांना बोलणीसाठी निमंत्रित केले आहे. सरकारी आरक्षणांची ५० टक्के मर्यादा असून त्यात गुज्जरांना पाच टक्के आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, गुज्जर नेत्यांनी सरकारने मांडलेला चर्चेचा प्रस्ताव फेटाळला असून सरकारने या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी केली आहे. गुज्जर आरक्षण संघर्ष समितीचे प्रवक्ते हिम्मत सिंह यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
आम्ही सायंकाळपर्यंत सरकारला निर्णय घेण्यासाठी वेळ देत आहोत, त्यानंतर आम्ही पुढची कृती ठरवू असे त्यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सरकारशी चर्चेचा प्रस्ताव मांडणारे पत्र गुज्जर नेते किरोरी सिंह बैन्सला यांना दिले. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी काल रात्री परिस्थितीचा आढावा घेतला व पोलिस-प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. राज्याचे गृह मंत्री गुलाबचंद कटारिया, पोलिस अधिकारी मनोज भट्ट व इतर अधिकारी या वेळी उपस्थित होते. काल सायंकाळापासून आंदोलक रेल्वे मार्गावर बसले असून त्यांनी रूळाच्या फिश प्लेट्स काढल्या आहेत. भरतपूरचे पोलिस महानिरीक्षक बिजू जॉर्ज जोसेफ, पोलिस अधीक्षक राहुल प्रकाश, जिल्हाधिकारी रवी जैन, इतर वरिष्ठ अधिकारी बयाना शहरात मुक्काम ठोकून आहेत व तेथे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.