दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी आपला राजकीय पक्ष सुरू करणार असल्याची घोषणा केल्यानंतर, आता त्यांच्याशी जुडण्यासाठी विविध पक्षांकडून प्रयत्न केले जात असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल निधी मयम या पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

कमल हासन यांनी रजीकांत यांच्याशी हात मिळवणी करण्यासंदर्भातील प्रश्नास उत्तर देताना सांगितले की, आमच्या केवळ एका फोनचा उशीर आहे. जर आमचे विचार सारखे आहे आणि यामुळे लोकांना फायदा होत असेल, तर आम्ही आमचा ‘इगो’ सोडून एकमेकांची मदत करण्यास तयार आहोत. कमल हासन यांच्या या प्रतिक्रियेमुळे आता हे दोन्ही सुपरस्टार राजकीय मैदानात देखील सोबत येणार का? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

कमल हासन यांनी मंगळवारी दिवंगत नेते एम जी रामचंद्रन (एमजीआर)यांच्या ऐतिहासिक कार्यांना उजाळा दिला आणि म्हटले की माजी मुख्यमंत्र्यांचे नाते संपूर्ण तामिळनाडूशी होते.

रजनीकांत यांचा मोठा निर्णय; ३१ डिसेंबरला करणार राजकीय पक्षाची घोषणा

यावेळी, अन्नाद्रमुक पार्टीचे नाव न घेता कमल हासन म्हणाले की, जेव्हापासून मी आपल्या भाषणांमध्ये एमजीआर यांच्या नावाचा उल्लेख करू लागलो आहे, तेव्हापासून एक पक्ष नाराज झाला आहे व त्यांचा दावा आहे की एमजीआर केवळ त्यांचेच आहेत. मात्र एमजीआर तर संपूर्ण तामिळनाडूचे आहेत, केवळ एका पक्षाचे नाहीत. हेच कारण आहे लोक त्यांना ‘मक्कल तिलगम'(जन नेता) म्हणत होते. भलेही ते कोणत्याही पार्टीशी जुडलेले असतील. अगोदर ते द्रमुकमध्ये होते व नंतर त्यांनी अन्नद्रमुकची स्थापना केली. राज्यातील संपूर्ण जनता एमजीआर यांना आपलं मानते आणि जर असं असेल व सत्तारुढ पक्ष त्यांना केवळ एकाच पक्षाचे नेते म्हणत असेल, तर अशा भूमिकेविरोधात जनता निर्णय देईल.

दरम्यान, रजनीकांत यांनी या अगोदर ट्वीट करत ३१ डिसेंबर रोजी आपल्या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच त्यांचा राजकीय पक्ष जानेवारी महिन्यापासून कार्यरत होईल असेही यावेळी सांगितलं आहे.

“देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय?”

याशिवाय रजनीकांतशी निगडीत असलेली संघटना रजनी मक्कल मंद्रम(आरएमएम)ने आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले की, ते रजनीकांत सुरू करत असलेल्या पक्षाच्या नावाची व निवडणूक आयोगाकडून त्यांना दिल्या जाणाऱ्या चिन्हाबाबतच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत.

दुसरीकडे, प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल निधी मयम या पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर या अगोदर नव्या संसद भवनाच्या उभारणीवरून टीका केलेली आहे. देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तामिळनाडूत २०२१ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. कमल हासन यांनी या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.