राजधानी दिल्लीत नवे संसद उभे राहणार आहे. त्यासाठी तब्बल एक हजार कोटींची खर्च येणार आहे. यावरुन आता प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल निधी मयम या पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय? असा सवाल कमल हासन यांनी आता विचारला आहे. तामिळनाडूत २०२१ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. कमल हासन यांनी या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी नव्या संसदेच्या मुद्द्यावरुन कमल हासन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

काय म्हणाले आहेत कमल हासन?
“अर्धा देश उपाशी झोपतो आहे. अशा परिस्थितीत एक हजार कोटींच्या संसद भवनाची गरज काय? करोना व्हायरसमुळे लोकांनी आपलं काम गमावलं आहे. चीनची भिंत बांधत असताना हजारो लोकांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांच्या देशातील नेत्यांनी सांगितलं की ही भिंत तुमच्या संरक्षणासाठी आहे. आता माझा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे की तुम्ही कुणाच्या संरक्षणासाठी नवं संसद भवन बांधत आहात? आदरणीय पंतप्रधानांनी मला या प्रश्नाचं उत्तर द्यावं” असं कमल हासन यांनी म्हटलं आहे.