ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेली भाजपा युवा मोर्चाची नेता पामेला गोस्वामी हिने भाजपा नेते राकेश सिंह यांच्याविरोधात खळबळजनक आरोप केला आहे. १०० ग्रॅम कोकेन बाळगल्याप्रकरणी पामेला गोस्वामीला पश्चिम बंगाल पोलिसांनी कोलकात्तामधून अटक केली होती.

पामेला गोस्वामीची पाच दिवसांची पोलीस कोठडी आज संपत होती. त्यामुळे तिला एनडीपीएस कोर्टात आज हजर करण्यात आले. बंगाल भाजपाचे नेते राकेश सिंह यांनी रचलेल्या कारस्थानाचा मी बळी ठरले, असा आरोप पामेला गोस्वामीने केला आहे.

“सत्य काय ते समोर येईल. राकेश सिंह यांच्याप्रमाणे मी कायद्यापासून पळणार नाही” असे पामेला गोस्वामी म्हणाली. “मी कारस्थानाची बळी ठरले आहे. राकेश सिंह यांची चुकी नाही, मग ते का पळत आहेत?” असा सवाल तिने केला.

“राकेश सिंह यांना मी आवडत होते. पण, मी जेव्हा त्यांना प्रतिसाद दिला नाही, तेव्हा ते संतप्त झाले व त्यांनी मला गोवण्याचा प्रयत्न केला” असा खळबळजनक आरोप पामेला गोस्वामीने केला आहे. “बऱ्याच काळपासून राकेश सिंह मला त्यांच्या जाळयात ओढण्याचा प्रयत्न करत होते. पण, जेव्हा मी त्यांना प्रतिसाद दिला नाही, तेव्हा ते संतप्त झाले” असे पामेला गोस्वामीने म्हटले आहे.

“राकेश सिंह माझा शारीरिक छळ करत होते. त्यांनी अ‍ॅसिड हल्ल्याचीही धमकी दिली होती” असा आरोप तिने केला. “राकेश सिंह यांच्या साथीदारांनी माझ्या गाडीत ड्रग्ज ठेवले. माझ्याविरोधात अशा प्रकारचे कारस्थान रचले जाईल याची मला फेब्रुवारीपासून कल्पना होती. ड्रग्ज प्रकरणात मला गोवले जाईल याची कल्पना नव्हती. शस्त्रास्त्राच्या प्रकरणात मला अडकवतील, असे मला वाटले होते” असे पामेला म्हणाली. दक्षिण कोलकात्तामधील न्यू अलीपोर भागातून पामेलाला शुक्रवारी लाखो रुपयांच्या कोकेनसह अटक करण्यात आली.