फुटीरवादी नेता मसरत आलम याच्या सुटकेच्या पाश्र्वभूमीवर भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची भेट घेऊन युतीचे भागीदार असलेल्या दोन्ही पक्षांमध्ये अधिक चांगला समन्वय असावा, अशी सूचना केली.
पीडीपीशी युती करण्यामध्ये प्रमुख मध्यस्थाची भूमिका बजावणारे माधव यांनी बुधवारी रात्री सईद यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि एक तासाहून अधिक वेळ विविध मुद्दय़ांवर चर्चा केली. यात त्यांनी प्रामुख्याने भाजप व पीडीपीमध्ये अधिक चांगला समन्वय असावा, अशी आग्रही भूमिका मांडल्याचे भाजपचे प्रवक्ते सुनील सेठी यांनी सांगितले.
पीडीपी-भाजप युती सरकारच्या मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाली, परंतु त्यात आलमच्या सुटकेचा मुद्दा चर्चिला गेला नाही. यानंतर माधव व सईद यांची भेट झाली. आलमच्या एकतर्फी सुटकेबद्दल भाजप व पीडीपी यांच्यात निर्माण झालेले मतभेद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी जाहीररीत्या व्यक्त केलेल्या नाराजीच्या पाश्र्वभूमीवर या भेटीला महत्त्व होते.
यापुढे सरकारने राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अशा मुद्दय़ांवर निर्णय घेण्यापूर्वी भाजपला विश्वासात घेतले जावे, तसेच सरकारने समान किमान कार्यक्रमाच्या आधारे काम करावे हे निश्चित करण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी आपले दूत म्हणून राम माधव यांना पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली.