नोटाबंदीमुळे बँक खात्यातून पैसे काढण्यावर घातलेल्या निर्बंधामुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. आरबीआयने आता बँकेतून पैसे काढण्यावर घातलेले निर्बंध मागे घेतले आहेत. त्यामुळे नवीन महिन्यात सर्वसामान्यांना त्यांच्या पगाराची रक्कम सहज काढता येणार आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर तुर्तास बँकेतून दर आठवड्याला २४ हजार रुपये काढता येत होते. चलन तुटवड्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता नवीन महिना सुरु होणार असून कर्मचा-यांच्या बँक खात्यात पगाराचे पैसे जमा होतील. पण निर्बंधांमुळे पगाराचे पैसे काढण्यात अडथळे येणार होते. या समस्येवर रिझर्व्ह बँकेने अखेर तोडगा काढला आहे. आता बँक खात्यातून पैसे काढण्यावर मर्यादा नसेल असे रिझर्व्ह बँकेने म्हटले. मात्र २९ नोव्हेंबर किंवा त्यानंतर जमा झालेले पैसे काढण्यावर निर्बंध नसतील असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आरबीआयचा हा निर्णय पगाराच्या पार्श्वभूमीवरच घेतल्याचे दिसते. खातेदारांना बँकेतून जास्त रक्कम काढताना दोन हजार आणि पाचशेच्या नोटाच मिळतील असेदेखील रिझर्व्ह बँकेच्या पत्रकात म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबररोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. यानुसार पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. यानंतर चलन तुटवडा निर्माण झाल्याने बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. दिवसाला १० हजार तर आठवड्याला २० हजार रुपये काढता येणार होता. यानंतर ही मर्यादा वाढवून आठवड्याला २४ हजार ऐवढी करण्यात आली होती. याशिवाय शेतकरी आणि छोट्या व्यापा-यांनाही बँकेतून पैसे काढण्यासाठी दिलासा देण्यात आला होता.