कोलकाता : लष्कर व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्या पथकांनी पश्चिम बंगालमध्ये नागरी अधिकारी व वन खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत मदतकार्य सुरू केले आहे. ही पथकेसॉल्ट लेक, बेहला, गोलपार्क भागात सकाळीच पोहोचली असून त्यांनी रस्ते मोकळे करण्यास सुरुवात केली आहे.

लष्करी दलांनी झाडे रस्त्यावरून उचलण्यासाठी उपकरणे आणली आहेत. रॉय बहादूर रोड, बेहला येथील पर्णश्री, दक्षिण कोलकात्यातील बॅलीगंज, सॉल्ट लेक भागात मदतकार्य सुरू केले आहे. लष्कर कोलकाता व आजूबाजूच्या जिल्ह्य़ात शनिवारी तैनात करण्यात आले असून पश्चिम बंगाल सरकारने पायाभूत सुविधा पुन्हा सुरू करण्यासाठी लष्करी मदतीची मागणी केली होती.

लष्कराच्या अनेक तुकडय़ा  कोलकाता शहर, उत्तर व दक्षिण २४ परगणा जिल्ह्य़ात तैनात करण्यात आल्या आहेत. या तीन भागात वादळामुळे जास्त नुकसान झाले आहे. एकूण ८६ बळी गेले आहेत. वादळाने अनेक घरे कोसळली असून पिकांचे नुकसान झाले आहे. वन खाते, कोलकाता महापालिका यांच्या कर्मचाऱ्यांनी रस्ते मोकळे करण्याचे काम सुरू केले आहे. वीज व पाणी पुरवठा अनेक भागांत विस्कळीत झाला आहे. कोलकात्यात शनिवारी रस्ते बंद असल्याने तसेच वीज व पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.