सुप्रसिद्ध इंग्लिश लेखक, पत्रकार आणि समीक्षक जॉर्ज ऑर्वेल यांचे जन्मठिकाण बिहार राज्यातील पूर्व चंपारण जिल्ह्य़ातील येथील गावी असून त्या ठिकाणचे ऑर्वेल यांच्या जुन्या घराचे नूतनीकरण करून तिथे जॉर्ज ऑर्वेल यांचे म्युझियम उभारण्याबरोबरच अनेक सोयीसुविधा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या नूतनीकरण प्रक्रियेची पायाभरणी बिहारचे कला व सांस्कृतिकमंत्री विनय बिहारी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आली.
‘अ‍ॅनिमल फार्म’, ‘नाइन्टीन एटी फोर’ यांसारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांचे लेखक म्हणून जॉर्ज ऑर्वेल प्रसिद्ध आहेत. २५ जून १९०३ रोजी मोतिहारी येथे जॉर्ज ऑर्वेल यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव इरिक ऑर्थर ब्लेअर असे आहे. ऑर्वेल यांच्या जन्माच्या वेळी त्यांचे वडील आर. डब्ल्यू. ब्लेअर तत्कालीन ब्रिटिश राजवटीतील इंडियन सिव्हिल सव्‍‌र्हिसमध्ये नोकरी करीत होते. ऑर्वेल केवळ एक वर्षांचे असतानाच त्यांचे कुटुंबीय इंग्लंडला परत गेले. ऑर्वेल यांच्या जन्मठिकाणाचे जतन व संवर्धन करून त्या ठिकाणी रोषणाई करण्याबरोबरच ऑर्वेल यांच्यावरील वस्तुसंग्रहालयही बनविण्यात येणार आहे. त्यांच्या मूळ घराच्या नूतनीकरणासाठी ५९ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.