News Flash

श्वसनयंत्रांचा हिशेब हवा!

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक रणनीती आखणे ही काळाची गरज असल्यावर मोदी यांनी भर दिला.

संग्रहित

पंतप्रधानांचे आदेश; काही राज्यांमध्ये वापर होत नसल्याची गंभीर दखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील करोना परिस्थितीचा उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेताना केंद्राने पुरवलेली श्वसनयंत्रे काही राज्यांत वापराविना पडून असल्याच्या प्रश्नाची गंभीर दखल घेतली आणि त्याच्या त्वरित लेखापरीक्षणाचे आदेश दिले. त्याचबरोबर कोणत्याही प्रतिकुल परिणामांची काळजी न करता राज्यांनी आकडे जाहीर करण्यात पारदर्शकता आणावी, असे आवाहन मोदी यांनी केले.

केंद्र सरकारने पुरवलेली श्वसनयंत्रे (व्हेण्टिलेटर्स) काही राज्यांमध्ये विनावापर गोदामात पडून असल्याच्या वृत्ताची पंतप्रधान मोदी यांनी गंभीर दखल घेत श्वसनयंत्रे बसविणे आणि त्यांच्या वापराचे तातडीने लेखापरीक्षण करण्यात यावे, असा आदेश दिला. गरज भासल्यास आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना श्वसनयंत्रांच्या योग्य वापराबाबत नव्याने प्रशिक्षण द्यावे, असे आदेशही देण्यात आल्याचे पंतप्रधानांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक रणनीती आखणे ही काळाची गरज असल्यावर मोदी यांनी भर दिला. ते म्हणाले, ज्या ठिकाणी संसर्गाचा दर जास्त आहे, तेथे संसर्ग प्रतिबंधासाठी स्थानिक स्वरूपाचे धोरण आखणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात करोनाचा वेगाने प्रादुर्भाव होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी घरोघरी जाऊन चाचण्या आणि तपासण्यांवर भर देण्याचे आवाहन संबंधितांना केले.

 

ग्रामीण भागासाठी प्राणवायू  वितरण योजनेची गरज

देशातील ५०० जिल्ह्यांमध्ये रुग्ण आढळण्याचा दर १० टक्क््यांहून अधिक असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी ग्रामीण भागांमध्ये प्राणवायूचा पुरवठा योग्य प्रकारे होण्यासाठी वितरण योजना तयार करण्याचे आदेश मोदी यांनी दिले, असे पंतप्रधानांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. प्राणवायू कॉन्सन्टे्रटर्ससारख्या उपकरणांच्या वापराबाबत आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले पाहिजे आणि अशा प्रकारची वैद्यकीय उपकरणे सुरळीतपणे चालावीत यासाठी विजेचा पुरवठाही योग्य प्रकारे केला पाहिजे, असेही मोदी यांनी नमूद केल्याचे पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

करोनाच्या पहिल्या लाटेचा तडाखा ग्रामीण भागांना मोठ्या प्रमाणावर बसला नव्हता, मात्र अनेक राज्यांमध्ये दुसऱ्या लाटेचा तडाखा ग्रामीण भागांना बसला आहे. आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आवश्यक ती उपकरणे हाताळण्याचे प्रशिक्षण देऊन सक्षम केले पाहिजे. ज्या ठिकाणी रुग्णसंख्यावाढ दर जास्त आहे तेथे आरटीपीसीआर आणि चाचण्यांचे प्रमाण वाढविले पाहिजे, असेही ते म्हणाले.

देशात मार्चच्या पूर्वार्धात चाचण्यांचे प्रमाण दर आठवड्याला जवळपास ५० लाख इतके होते ते आता १.३ कोटींवर गेले आहे. या वेळी अधिकाऱ्यांनी राज्य आणि जिल्हा स्तरावरील चाचण्यांची स्थिती, प्राणवायूची उपलब्धता, आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणि लसीकरण याबाबत सविस्तर सादरीकरण केले.

राज्यांना आकडे पारदर्शकपणे नोंदवण्याचे आवाहन

वाढत्या संख्येच्या दबावाखाली न येता करोनाशी संबंधित आकडे पारदर्शकपणे नोंदवले जावेत, यासाठी राज्यांना प्रोत्साहित केले पाहिजे, असे मोदी यांनी नमूद केले. कोणत्याही प्रतिकुल परिणामांची चिंता न करता राज्यांनी आकडे जाहीर करण्यात पारदर्शकता आणावी, असे आवाहन मोदी यांनी केले.

रुग्णसंख्यावाढीचा दर अधिक असलेल्या ठिकाणी चाचण्या वाढवणे, प्रतिबंधासाठी स्थानिक पातळीवर धोरण आखणे आणि ग्रामीण भागात आरोग्य क्षमतावाढ करण्याबरोबरच लसीकरणाची गती वाढवणे आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2021 1:37 am

Web Title: respiratory system should be accounted for by the prime minister order akp 94
Next Stories
1 फायनान्शियल एक्स्प्रेसचे व्यवस्थापकीय संपादक सुनील जैन यांचे निधन
2 ‘व्हाइट हाऊस’च्या वरिष्ठ सल्लागारपदी नीरा टंडन
3 दिल्लीत मोदींविरोधात भित्तिपत्रके; १५ जणांना अटक
Just Now!
X