मध्य प्रदेशातील २८ विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. १९ जागांवर आघाडी असल्याने भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. काँग्रेसला या पोटनिवडणुकीत यश मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, त्या आशेवर पाणी फेरलं गेलं असल्याचं दिसत आहे. यावरून आता भाजपा नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी माजी मुख्यमंत्री कमलनाथ व काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे.

मी भाजपाचा कार्यकर्ता आहे. पक्षाच्या बाजूने स्पष्टपणे कौल दिल्याबद्दल मी राज्यातील जनतेचा आभारी आहे. निकालाने हे स्पष्ट केले आहे की, कमलनाथ व दिग्विजय सिंह धोकेबाज आहेत. असं ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे. तसेच, इव्हीएमच्या विश्वासर्हतेबद्दल जर ते असेच प्रश्न उपस्थित करत राहिले. तर ते आहे तिथेच किंवा यापेक्षाही वाईट ठिकाणी असतील, असं देखील ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बोलून दाखवलं आहे.

मार्च महिन्यात ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत २२ आमदरांसह भाजपात प्रवेश केला होता. यानंतर आणखी तीन आमदार भाजपात दाखल झाले होते. तर, विद्यमान तीन आमदारांचे निधन झाल्याने त्यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या.