पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालातून काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक नुकसान झाले. पश्चिाम बंगालची निवडणूक प्रतिष्ठेची करूनही भाजपला अपयश आले असले तरी आसामची सत्ता कायम राखणे आणि दक्षिणेतील पुदुच्चेरीत सत्तेतील भागीदारी यातून भाजपचा फायदाच झाला.
गेली चार दशके केरळमध्ये डावे पक्ष आणि काँग्रेसमध्ये आलटून पालटून सत्तेत येतात. लोकसभा निवडणुकीत २० पैकी १९ जागा काँग्रेस आघाडीने जिंकल्या होत्या. केरळमधील वायनाडचे खासदार असलेले राहुल गांधी प्रचाराकरिता जास्तीत जास्त केरळात गेले होते. तरीही मतदारांनी काँग्रेसला नाकारले.
तीन दशके सत्ता भूषविलेल्या पश्चिाम बंगालमध्ये डाव्यांना भोपळाही फोडता आला नाही. केरळातील सत्ता कायम राखल्याने डाव्या पक्षांना तेवढाच दिलासा मिळाला.
आसामची सत्ता कायम राखल्याने भाजपचा ईशान्य भारतातील पाया अधिक भक्कम झाला. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि नागरिकत्व पडताळणी हे भाजपच्या दृष्टीने दोन्ही प्रतिष्ठेचे मुद्दे. आसाममध्ये गत वेळच्या तुलनेत जागा वाढल्याने भाजपसाठी हे फायद्याचे ठरणार आहे. दक्षिणते कर्नाटक वगळता भाजपला अन्य कोणत्याच राज्यात हातपाय पसरता आले नाही. तमिळनाडू आणि केरळात पक्षाला अपेक्षित यश मिळू शकले नाही. पुदुच्चेरीत मात्र सत्तेत भागीदारी मिळणार असल्याने कर्नाटकनंतर दक्षिणेतील दुसºया राज्यात भाजप सत्तेत सहभागी होईल. तमिळनाडूत प्रादेशिक पक्षांचेच महत्व पुन्हा अधोरेखित झाले.
पश्चिम बंगालमध्ये ४४ जागांसह प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला यावेळी एकही जागा मिळाली नाही.