नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वात लोकशाहीप्रधान संघटना आहे. संघात कोणा एकाची मनमानी चालत नाही. संघ विचारांवर अंकुश ठेवत नाही. संघाच्या शाखांपासून प्रतिनिधी सभेपर्यंत विविध स्तरांवर विचारांचे आदानप्रदान, चर्चा केली जाते. त्यातूनच एखाद्या मुद्दय़ावर अखेर सहमती होते. हीच संघाची अत्यंत खुली कार्यपद्धती असल्याचे विवेचन सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी केले.

‘भविष्यातील भारत’ या विषयावर संघाने व्याख्यानमाला आयोजित केली असून सलग तीन दिवस भागवत भाषण करणार आहेत. शिवाय, १९ सप्टेंबर रोजी अखेरच्या दिवशी उपस्थितांच्या प्रश्नांनाही भागवत उत्तरे देतील. सोमवारी झालेल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना नेमकी काय आहे आणि ती कोणते काम करते यावर भागवत यांनी विस्तृत मांडणी केली. या व्याख्यानमालेसाठी विविध देशांचे राजदूत, राजकीय पक्षांचे नेते, विविध क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले होते. डावे पक्ष आणि काँग्रेस नेत्यांनाही निमंत्रण दिल्याचे सांगितले जात होते मात्र, त्यांच्यापैकी कोणीही भागवतांच्या विवेचनाला उपस्थित नव्हते.

संघाच्या खुल्या कार्यपद्धतीबद्दल भागवत म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नामकरणदेखील संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी केलेले नाही. तीन पर्याय उपलब्ध होते. बैठकीत जमलेल्या लोकांनी बहुमताने संघाचे नाव ठरवले. कोणत्या क्षेत्रात आणि कुठे जाऊन कार्य करायचे हे स्वयंसेवकच ठरवतात. संघ त्यांना आदेश देत नाही. जिथे जाल तिथला समाज आपला मानून, राष्ट्रभक्तीने आणि कठोर शिस्तीने काम करावे एवढीच अपेक्षा संघ करतो! संघ परिवारातील संघटना आणि स्वयंसेवक स्वतंत्र, स्वायत्त आणि स्वावलंबी आहेत. त्यामुळेच सर्व क्षेत्रांत संघाचे स्वयंसेवक काम करताना दिसतील.

संघ हा ‘सर्व लोकयुक्त’ विचारांचा आहे. आम्ही मुक्तवाल्या विचारांचे नाही, असे सांगत भागवत यांनी युक्तिवाद केला की, भारतातील कोणीही संघाला परका नाही. जे संघाला, हिंदू संस्कृतीला परके मानतात तेही आमचेच आहेत. म्हणूनच आम्ही सगळ्यांना बोलवतो. संघाला विरोध करा पण, तो वस्तुस्थितीच्या आधारावर करा एवढेच संघाचे म्हणणे आहे.

देशावर मुस्लिमांनी, इंग्रजांनी आक्रमणे करून हा देश जिंकून कसा घेतला? त्यासाठी हिंदू समाजालाच दोष द्यायला हवेत. या समाजातच कमतरता होती म्हणून देशाचे, समाजाचे पतन झाले. हिंदू समाजामध्ये मूल्यांचा ऱ्हास झाला. हा ऱ्हास थांबवणे म्हणजेच हिंदू विचार. मूल्याधारित संस्कृती म्हणजेच हिंदूपणा. या हिंदूपणातून समाजाला उभे करण्याचा विचार म्हणजे संघाची कार्यपद्धती. समाज निर्माणसाठी व्यक्तीनिर्माण करायला हवे. हे काम संघ करत आहे. त्यातून समाज परिवर्तन होईल. त्यासाठी संपूर्ण हिंदू समाजाला एकत्र करण्याचा अथक प्रयत्न संघ करत असल्याचा विचार भागवत यांनी अधोरेखित केला. डॉ. हेडगेवार यांच्या विचारप्रक्रियेचा आधार घेत संघाच्या विचारांची भागवत यांनी मांडणी केली.

संघात भगव्या ध्वजाला अधिक महत्त्व दिले जाते हा आरोप चुकीचा आहे. तिरंग्याचाही सन्मान केला जातो. फैजापूरच्या काँग्रेस अधिवेशनात तिरंगा फडकवला गेला. तिथे अडकलेला तिरंगा खांबावर चढून पुन्हा वर फडकवण्याचे काम स्वयंसेवकानेच केले होते. पंडित नेहरूंनी त्याच्या पाठीवर थाप मारून त्याचे कौतुक केले होते. – मोहन भागवत, सरसंघचालक