दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दारूण पराभव पत्करावा लागल्याने आता काँग्रेस पक्षात दोषारोपांचे सत्र सुरू झाले आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी, ज्येष्ठ नेत्यांना जाहीरपणे टीका करणे टाळण्याच्या सक्त सूचना दिल्या असल्या तरी एकमेकांवर खापर फोडण्याचे प्रकार पक्षात सुरूच आहेत. 

काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अजय माकन यांच्यावर माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी पराभवाचे खापर फोडले तर पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. सी. चाको यांनी शीला दीक्षित यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीवरच हल्ला चढविला. शीला दीक्षित यांच्यापाठोपाठ त्यांचे पुत्र संदीप दीक्षित यांनीही काँग्रेस पक्षाचा कारभार ज्या पद्धतीने सुरू आहे त्यावर जोरदार टीका केली आहे. विशिष्ट वर्गालाच महत्त्व देण्यात येत असल्याने उद्धटपणा वाढत चालला असून विश्वासार्ह नेत्यांची फळीच राहिलेली नाही, असे संदीप दीक्षित यांनी म्हटले आहे.