हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सारढा चिटफंड कंपनीचे अध्यक्ष सुदिप्तो सेन यांच्यासह त्यांच्या अन्य दोन साथीदारांना गुरुवारी न्यायालयाने १४ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. बिधाननगर येथील न्यायालयामध्ये सेन आणि देबजानी मुखोपाध्याय आणि अरविंद सिंग चौहान यांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एच. एम. रहमान यांच्यापुढे हजर करण्यात आले. त्यांच्यावर भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ४०६, ४२० आणि ५०६ नुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पोलिस चौकशीच्यावेळी सेन यांच्यासोबत त्यांचे वकील तिथे उपस्थित राहू शकतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. सेन यांना जम्मू-काश्मीरमधील सोनमर्ग येथून मंगळवारी अटक करण्यात आली होती.