माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांच्या सीबीआय कोठडीत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी गुरुवापर्यंत वाढ केली. तसेच दिल्ली न्यायालयाने काढलेले अजामीनपात्र वॉरन्ट आणि सीबीआय कोठडीविरोधातील त्यांच्या याचिकाही गुरुवारी सुनावणीस येणार आहेत.  विशेष म्हणजे, त्यांना तिहार तुरुंगात ठेवले जावे, अशी सीबीआयची इच्छा होती. ‘आमची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यांना आमच्या कोठडीत ठेवण्याची गरज नाही,’ असे सीबीआयच्या वतीने  सांगण्यात आले. तसेच दिल्ली न्यायालयाच्या निकालाविरोधात या टप्प्यावर सर्वोच्च न्यायालयात त्यांची याचिका विचारात घेतली जाण्यासही सीबीआयने तीव्र आक्षेप घेतला होता. मात्र न्यायालयाने तो नाकारला.

त्यानंतर दिल्ली न्यायालयानेही गुरुवारी याप्रकरणी सुनावणी ठेवली. दिल्ली न्यायालयाने त्यांना ठोठावलेल्या १५ दिवसांच्या सीबीआय कोठडीची मुदत गुरुवारी  संपत असल्याने गुरुवारचा दिवस चिदम्बरम प्रकरणात महत्त्वाचा ठरणार आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातून चिदम्बरम यांना बाहेर आणले गेले तेव्हा पत्रकारांनी त्यांना, न्यायालयात काय झाले, असे विचारले.

त्यावर हाताची पाच बोटे दाखवत चिदम्बरम उद्गारले, ‘पाच टक्के!’ देशाच्या आर्थिक विकासदरातील घसरणीवर त्यांचा हा टोला होता.