दिवाळीच्या काळात संपूर्ण देशात फटाक्यांच्या वापरावर सरसकट बंदी घालण्याला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती न केल्याबद्दल न्यायालयाने केंद्र सरकारबद्दल नाराजीही व्यक्त केली.
सरन्यायाधीश एच. एल. दत्तू आणि न्या. अरूण मिश्रा यांच्या खंडपीठाने या प्रकरणी निकाल दिला. फटाक्यांच्या वापरावर थेटपणे बंदी घालता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचवेळी फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांच्या माध्यमातून तातडीने जनजागृती सुरू करावी. फटाक्यांचे लोकांच्या शरीरावर काय दुष्परिणाम होतात, याबद्दल माहिती देण्यात यावी, असे निर्देश न्यायालयाने केंद्र सरकार आणि संबंधित संस्थांना दिले. येत्या ३१ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या काळात याबाबत जागृती करण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
रात्री दहा ते सकाळी सहा या काळात फटाक्यांच्या वापरावर असलेले निर्बंध कायम असतील, असेही न्यायालयाने सांगितले. याबाबतही लोकांना माहिती देण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.