04 March 2021

News Flash

मेंदूचे अधिक वास्तव प्रारूप

वैज्ञानिकांनी प्रथमच मेंदूचे अधिक वास्तव प्रारूप तयार केले असून, हा मेंदू बुद्धय़ांक चाचणीही यशस्वीपणे पार पाडू शकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. महासंगणकावर चालणारा हे

| December 3, 2012 02:23 am

बुद्धय़ांक चाचणीस सामोरे जाण्यास सक्षम
वैज्ञानिकांनी प्रथमच मेंदूचे अधिक वास्तव प्रारूप तयार केले असून, हा मेंदू बुद्धय़ांक चाचणीही यशस्वीपणे पार पाडू शकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
महासंगणकावर चालणारा हे मानवी मेंदूचे प्रारूप असून, त्याला डिजिटल डोळाही आहे. त्याच्या मदतीने त्याला दृश्यात्मक संदेश मिळू शकतात. यांत्रिक बाहूच्या मदतीने तो आपला प्रतिसाद देऊ शकतो, असे ‘डेली मेल’च्या वृत्तात म्हटले आहे. कॅनडातील वॉटर्लू विद्यापीठाचे मेंदूवैज्ञानिक व सॉफ्टवेअर अभियंते यांनी मानवी मेंदूचे हे जगातील सर्वात गुंतागुंतीचे प्रारूप तयार केले असल्याचे एक्स्ट्रिमटेक या संकेतस्थळावरील माहितीवरून स्पष्ट झाले आहे. ‘स्पॉन’ (सेमँटिक पॉइंटर आर्किटेक्चर युनीफाईड नेटवर्क) असे त्याचे नामकरण करण्यात आले असून, त्यात २५ लाख न्यूरॉन्स वापरले आहेत, त्यामुळे हा मेंदू आठ वेगवेगळी कामे करू शकतो. चित्राची नक्कल तयार करणे, आकडे मोजणे, प्रश्नांची उत्तरे देणे व कार्यकारणभाव सांगणे अशी कामे हा मेंदू करू शकतो.
चाचण्यांमध्ये वैज्ञानिकांनी काही आकडे व अक्षरे त्याला दाखवली, ती स्पॉनने स्मृतींच्या मदतीने ओळखून दाखवली. काही प्रतीके ही आज्ञा देण्याचे काम करतात व त्यामुळे स्पॉनला नेमके काय करायचे हे समजते. नंतर यांत्रिक बाहूच्या मदतीने आज्ञेनुसार हालचालीही केल्या जातात.
स्पॉन या मेंदूच्या प्रारूपात २५ लाख न्यूरॉन आहेत ते आणखी उपयंत्रणांमध्ये विखुरलेले आहेत. त्यात मानवी मेंदूत जशी त्यांची जोडणी केलेली असते तशी करण्याचा प्रयत्न केला आहे. दृश्य संदेशावर थॅलॅमसकडून प्रक्रिया केली जाते. माहिती न्यूरॉन्समध्ये साठवली जाते व नंतर गँगलिया या भागामार्फत संदेश पुढे पाठवून हवे ते काम केले जाते. ख्रिस एलियास्मिथ यांच्या नेतृत्वाखालील संशोधक पथकाने यात आणखी पुढची पायरी गाठण्याचे ठरवले असून, त्यात स्पॉनला न्यूरॉन्सची फेरजुळणी व नवीन कामे शिकण्याचे कौशल्य प्राप्त करून दिले जाणार आहे. एलियास्मिथ यांनी या प्रयोगात काही कृत्रिम न्यूरॉन्सचे काम थांबवून वयोमानामुळे व इतर कारणांनी मेंदूच्या कार्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला आहे. ‘सायन्स’ नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2012 2:23 am

Web Title: scientists create most realistic artificial human brain yet
Next Stories
1 एका सभागृहाचा पाठिंबा ‘फेमा’साठी पुरेसा
2 लष्करप्रमुखांची भारत-चीन सीमेला भेट
3 भाजप नेत्यांना मोदीस्तुतीचे भरते
Just Now!
X