नोटाबंदीनंतर देशभरात निर्माण झालेल्या चलनकल्लोळावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. सर्वसामान्यांना आता पेट्रोल पंपावरही पैसे काढणे शक्य होणार असून तुर्तास एसबीआयच्या पीओएस मशिन असलेल्या पेट्रोलपंपावर या सुविधेचा लाभ घेता येईल. पहिल्या टप्प्यात देशातील अडीच हजार पेट्रोल पंपावर पैसे काढणे शक्य होणार आहे. पेट्रोल पंपावर दोन हजार रुपयांपर्यंत पैसे काढता येतील.

८ नोव्हेंबररोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याची घोषणा केली. यानंतर बँक आणि पोस्ट ऑफीसबाहेर जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. चलनाचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांचे हाल सुरु आहेत. एटीएम आणि बँकांबाहेर पैसे काढण्यासाठी गर्दी झाली आहे. या गर्दीतून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. देशभरातील अडीच हजार पेट्रोल पंपावर आता पैसे काढणे शक्य होणार आहे. तुर्तास एसबीआय बँकेच्या पीओेएस मशिन असलेल्या पेट्रोल पंपावरच पैसे काढण्याची सुविधा असेल. एसबीआय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा संयुक्त उपक्रम राबवला आहे. एसबीआयचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड असलेल्या ग्राहकांना या निर्णयाचा फायदा होईल. पेट्रोल पंपावर प्रति व्यक्ती प्रति दिवस दोन हजार रुपये काढता येतील. आगामी काळात एचडीएफसी, आयसीआयसीआय, सिटी बँक यासारख्या बँकांच्या ग्राहकांनाही या सुविधेचा लाभ घेता येईल.

पेट्रोल पंपावर पीओएस मशिनमध्ये स्वॅप मारुन ग्राहकांना दोन हजार रुपये काढता येतील. पीओएस मशिनचा वापर प्रामुख्याने स्वॅप मारण्यासाठी केला जातो. आगामी काळात देशभरातील २० हजार पेट्रोल पंपावर पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल अशी माहिती अधिका-यांनी दिली.  पेट्रोल पंपावर पैसे काढणे शक्य होणार असल्याने सर्वसामान्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. गुरुवारी केंद्र सरकारने लग्नासाठी बँकेतून अडीच लाख रुपये काढता येतील अशी घोषणा केली होती. याशिवाय शेतक-यांना बँकेतून २५ हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे. पण आजपासून (शुक्रवार) नागरिकांना बँकेत ४५०० रूपयांऐवजी फक्त २००० रूपये मुल्याच्याच नोटा बदलून मिळणार आहेत.