राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्यात मध्यस्थ असलेले सुरेश सोनी यांना या पदावरून हटवण्याचा कोणताही इरादा नसल्याचे शुक्रवारी संघातर्फे स्पष्ट करण्यात आले. भाजपमधील अतिहस्तक्षेपामुळे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सोनी यांना हटवण्याचा आग्रह संघधुरीणांकडे धरला होता. मात्र, संघाने अडवाणींच्या या आग्रहाला थारा दिलेला नाही.
नरेंद्र मोदींचे कट्टर समर्थक असलेल्या सोनी यांनीच मोदी यांना भाजपच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे तेव्हापासूनच अडवाणी सोनींवर नाराज आहेत. सोनी यांनी त्यांची मर्यादा सोडून भाजपमध्ये अतिहस्तक्षेप चालवला असून त्यांना तातडीने या पदावरून दूर करण्यात यावे, अशी आग्रही भूमिका अडवाणी यांनी संघधुरीणांकडे मांडली होती. मात्र, संघाच्या सूत्रांनी अडवाणींच्या या मागणीकडे दुर्लक्ष करीत सोनी यांचे महत्त्व कमी करण्याचा संघाचा कोणताही इरादा नसल्याचे स्पष्ट केले.
सोनी यांना हटवले जाणार असल्याचे वृत्त राजधानीत पसरले . या पाश्र्वभूमीवर संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी शुक्रवारी ट्विटरवरून सोनी यांच्या भूमिकेत बदल करण्याचा संघाचा कोणताही इरादा नसल्याचे स्पष्ट केले.