26 February 2021

News Flash

काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला

सुरक्षा दलांशी चकमकीत अनेक जण जखमी

| September 12, 2016 01:18 am

पूंछ येथे झालेल्या चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणाला वेढा दिला.

चकमकीत सात दहशतवादी ठार

काश्मीरमध्ये नौगाम भागात प्रत्यक्ष ताबा रेषेवर लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला त्यात चार दहशतवादी मारले गेले आहेत. पूँछ मधील चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. रविवारी एकूण तीन ठिकाणी घुसखोरीचा उधळण्यात लष्कराला यश आले. लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, नौगामा भागात लष्कराच्या जवानांना संशयास्पद हालचाली दिसल्या व त्यांनी घुसखोरांना आव्हान दिले. त्यानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला असता त्याला प्रत्युत्तर देण्यात आले. या वेळी चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. युद्धकाळात वापरतात तशी सामुग्री त्यांच्याकडे सापडली आहे. अजून चकमक सुरू आहे.

दरम्यान काश्मीरमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवर आणखी दोन क्षेत्रात म्हणजे तंगधर व गुरेझ भागात घुसखोरीचे दोन प्रयत्न हाणून पाडण्यात आले, असे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. यात दोन्ही ठिकाणी लष्कराच्या मोहिमा  सुरू असून तेथे प्राणहानी झालेली नाही असे सांगण्यात आले.

लष्कराने रविवारी चकमकीत चार दहशतवाद्यांना ठार केल्याचे श्रीनगर येथील लष्कर प्रवक्ते मनीष कुमार यांनी सांगितले. कुपवाडाच्या नौगाम भागात ही चकमक झाली. तो घुसखोरीचा प्रयत्न होता. दहशतवाद्यांकडे एके ४७ रायफली व शस्त्रसाठा सापडला आहे.

पीर पांजाल खोऱ्यातील पूँछ क्षेत्रात दहशतवाद्यांनी ९३ ब्रिगेड मुख्यालयावर गोळीबार केला तेथे दहशतवादी लपून बसले आहेत. बांधकाम चालू असलेले सचिवालय व एका निवासी घरात दहशतवादी लपले आहेत, यावेळी चकमकीत राज कुमार नावाचा एक पोलीस शहीद झाला असून एक नागरिक जखमी झाला आहे.

 

बुरहान वानीच्या मृत्यूनंतर दक्षिण काश्मीरमधील अनेक युवक हिज्बुलमध्ये

श्रीनगर : हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी याच्या चकमकीतील मृत्यूनंतर दक्षिण काश्मीरमधील अनेक युवक बेपत्ता असून ते हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये सामील झाल्याचे समजते. पुलवामा, कुलगाम, शोपिया, अनंतनाग या चार जिल्ह्य़ांत वानी याच्या ८ जुलैला झालेल्या चकमकीतील मृत्यूनंतर मोठय़ा प्रमाणात हिंसाचार झाला होता. सुरक्षा दलांशी युवकांचा संघर्ष वाढला होता. लष्कराला जी गुप्तचर माहिती मिळाली आहे त्यावरून दक्षिण काश्मीरमधील युवक हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये सामील होत आहेत व काही बंदी घालण्यात आलेल्या लष्कर ए तोयबा या संघटनेत दाखल झाले आहेत. सुरक्षा दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील ग्रामीण भागात नेमकी काय परिस्थिती आहे याचे चित्र स्पष्ट झालेले नाही. लष्कर व सुरक्षा दले या भागात आहेत. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यावर गेल्या दोन दिवसात जास्त भर दिला आहे. दक्षिण काश्मीरमध्ये लष्कर तैनात करण्यात आले आहे. हा भाग राजकीयदृष्टय़ा संवेदनशील आहे व आंदोलकांनी काबीज केलेला किंवा त्यांचा प्रभाव असलेला प्रदेश पुन्हा कायदा व सुव्यवस्थेत आणणे हा मूळ हेतू आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांची अलीकडेच एक बैठक झाली असून त्यात आंदोलकांच्या ताब्यातील भाग पुन्हा नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले जावेत असे सुचवण्यात आले त्यानुसार कृतीही सुरू करण्यात आली. दक्षिण काश्मीर हा पीडीपीचा बालेकिल्ला असून तेथे दहशतवादी कारवायांचा जन्म होत आहे. युवक त्याकडे आकर्षित होत आहेत. दहशतवाद्यांचे गुप्तचर जाळे, स्थानिक लोकांची दहशतवाद्यांना मदत, दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला मोठी गर्दी, सुरक्षा दलांवर दगडफेक असे प्रकार तेथे होत आहेत. लहान मुलांच्या हातात लाठय़ा काठय़ा व दगड असून ते राष्ट्रीय महामार्ग रोखत आहेत. सुरक्षा दले व निदर्शक यांच्यात सतत चकमकी होत असून त्यात शांतता राखण्यात फार यश आलेले नाही. विविध दहशतवादी गटात सामील झालेल्यांची संख्या १०० पेक्षा अधिक आहे. त्यातील ८० टक्के युवक हे दक्षिण काश्मीरमधील आहेत. शोपिया जिल्ह्य़ातील हेफश्रीमल, पुलवामा जिल्ह्य़ातील त्राल व पुलवाम शहर, संबुरा व लिलाहार, कुलगाम जिल्ह्य़ातील कैमूह व रेधवानी तसेच अनंतनाग जिल्ह्य़ातील काही भागात दहशतवादाचा मोठा फटका बसला आहे. दहशतवाद्यांचे गुप्तचर जाळे १९९० मध्ये संपले होते ते पुन्हा कार्यरत झाले आहे. पॉपलर व पाइन वृक्षांच्या जंगलात दहशतवाद्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. शोपिया जिल्ह्य़ातील कमला जंगलात त्यांना प्रशिक्षण दिले जात असून २३ लाख लोकसंख्या असलेला दक्षिण काश्मीरचा भाग राजकीय दृष्टीने क्रियाशील आहे. जमात ए इस्लामियाचा तो बालेकिल्ला आहे.

 

पुलवामा जिल्ह्य़ात सुरक्षा दलांशी चकमकीत अनेक जण जखमी

श्रीनगर : काश्मीरधील पुलवामा जिल्ह्य़ात दगडफेक करणाऱ्या निदर्शकांच्या सुरक्षा दलांशी चकमकी झाल्या असून त्यात अनेक नागरिक रविवारी जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. करिमाबाद व आसपासच्या भागातील अनेक लोक सकाळपासून निदर्शनांसाठी रस्त्यावर होते. सुरक्षा दलांनी टाकलेल्या छाप्यांना त्यांचा विरोध होता त्यामुळे त्यांनी निदर्शने केली असे पोलिसांनी सांगितले. निदर्शकांनी दगडफेक सुरू केल्यानंतर सुरक्षा दलांनी अश्रुधुराची नळकांडी फोडत पेलेट गन्सचा वापर केला. यात जखमी झालेल्या वीस जणांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजूनही तेथे चकमकी सुरू आहेत.

दरम्यान गेल्या महिन्यात सुरक्षा दलांशी चकमकीत जखमी झालेल्या एका युवकाचा मृत्यू झाला त्यामुळे काश्मीरमधील मृतांची संख्या आता ७६ झाली आहे. जावेद अहमद दर याला सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात बदगाम जिल्ह्य़ात नरबाल येथे पायावर गोळी लागली होती, ही घटना ५ ऑगस्टला घडली होती असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. गोळीबारात जखमी झाल्याने त्याचा पाय कापावा लागला होता व त्यामुळे मूत्रपिंडावर परिणाम झाला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. हिज्बुलचा कमांडर बुरहान वानी याचा ८ जुलैला चकमकीत मृत्यू झाला होता त्यानंतर काश्मीर खोऱ्यात नऊ जुलैला चकमकी सुरू झाल्या होत्या त्या अजून सुरू आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2016 1:18 am

Web Title: seven terrorist killed in encounters in kashmir
Next Stories
1 सरसंघचालक चुकू शकतात!
2 भारतीय वंशाच्या चार प्रमुख उद्योजकांचा अमेरिकेत गौरव
3 वैध अण्वस्त्रसज्ज राष्ट्र म्हणून मान्यतेची उ. कोरियाची मागणी
Just Now!
X