ओडिसामधील भुवनेश्वर येथे मसाज पार्लरच्या नावे सेक्स रॅकेट सुरु होतं. थायलंडच्या आठ तरुणी या मसाज पार्लरच्या आड देहविक्री करत होत्या. या सर्व तरुणी सेक्स रॅकेटमध्ये सहभागी होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली होती. पोलिसांनी मसाज पार्लरवर धाड टाकत देहविक्री करणाऱ्या तरुणींना अटक केली असून त्यांना भारत सोडून जाण्यासाठी नोटीस दिली. आदेशाचं पालन करत तरुणींना भारत सोडून थायलंडला परतावं लागलं आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, २० मे रोजी पोलिसांनी भुवनेश्वर येथील बापूजी नगर परिसरातील एका स्पा सेंटरवर छापा टाकला होता. छापेमारीदरम्यान मसाजच्या नावे सुरु असलेला देहव्यापार पाहून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. देहविक्रीत सहभागी असलेल्या सर्व तरुणी परदेशी असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. या सर्व तरुणींना नियमांचं उल्लंघन केलं होतं. काही तरुणी टुरिस्ट तर काहीजणी बिजनेस व्हिसा घेऊन भारतात आल्या होत्या.

राज्यात अशाप्रकारच्या चुकीच्या गोष्टींना कोणतंही स्थान नसल्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तरुणींना देश सोडून जाण्याची नोटीस बजावली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मे रोजी तरुणींना भारत सोडून जाण्याची नोटीस बजावण्यात आली होती. ४८ तासात त्यांना देश सोडणं भाग होतं. पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या मॅनेजर आणि सहा ग्राहकांनाही अटक केली आहे. यानंतर पोलिसांनी थायलंड दुतावासाशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली.