दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) विद्यार्थी शहला रशीद आणि कन्हैया कुमार यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. या दोघांनी कायमच भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारला विरोध दर्शवला आहे. कन्हैया कुमार हा जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता असून शहला रशीद ही जेएनयूतील पीएचडीची विद्यार्थीनी असून ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनची (AISA)ची उपाध्यक्ष होती. २०१६ मध्ये जेएनयूत मोदी सरकारविरोधातील आंदोलनामुळे हे दोघे प्रकाशझोतात आले होते.

शहला आणि कन्हैया यांनी सांगितले की, भाजपाविरोधात सामाजिक-राजकीय तसेच पुरोगामी विराचांच्या संघटनांना एकत्र आणण्याचे काम आम्ही करणार आहेत. तसेच आपण यामध्ये विजयी होऊ असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी गुजरातचे दलित आमदार जिग्नेश मेवाणी यांना मिळालेल्या यशाचा दाखला दिला आहे. एका वेबपोर्टलने याबाबत वृत्त दिले आहे.

कन्हैयाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, आपण कधीही निवडणूक लढवणार नाही. मात्र, बिहारमध्ये राजद-काँग्रेस-डावे यांची युती असती आणि त्यांनी मला त्यांचा सर्वसाधारण उमेदवार निवडले तर मी तयार असेन. कारण, माझा संघटित राजकारणावर विश्वास आहे. मला जर कुठली निवडणूक लढवावी वाटली तर मी ती मुख्य प्रवाहातील पक्षाकडून लढवेन. माझा व्यक्तिगत प्रसिद्धीच्या जोरावर निवडणूक लढवण्यावर विश्वास नाही, असे कन्हैया कुमारने म्हटले आहे.

तर शहलाने सांगितले की, तीने यापूर्वी निवडणूक कार्यालयाचे कामकाज सांभाळले आहे. सध्यातरी ती निवडणूक लढवण्यास तयार नाही. मात्र, सर्व गोष्टी सर्वसाधारण असतील आणि अशात जर तीने एखाद्या ठिकाणाहून निवडणूक लढवावी अशी परिस्थिती निर्माण झाली तर ती नक्कीच निवडणूकीच्या रिंगणात उतरेन. सध्या शहला जेएनयूतून पीएचडी करीत आहे. श्रीनगरची रहिवासी असलेल्या शहलाने सांगितले की, तीने कधीही कुठलाही पक्ष किंवा मतदारसंघाची अद्याप निवड केलेली नाही. मात्र, शहलाच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या सांगण्यानुसार ती पश्चिम उत्तर प्रदेशातून एखाद्या जागेवरून निवडणूक लढू शकते.